फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर, राणेंना मंत्रिपदासाठी पाहावी लागणार वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:40 AM2017-11-14T10:40:26+5:302017-11-14T10:40:57+5:30
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आता हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचंही भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली.
गेल्या काही दिवसांपासून हिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असल्याची चर्चा होती. परंतु आता तो लांबणीवर पडल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री विनय कोरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात काहीशी कमकुवत असलेल्या भाजपाची नारायण राणेंच्या माध्यमातून घट्ट पाय रोवण्याची रणनीती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक माजी मुख्यमंत्री फोडून भाजपा काँग्रेसचे आणखी खच्चीकरण करण्याच्या तयारीत आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पात बिल्डरला लाभ देणे आणि मुख्यमंत्र्यांचा खोटा शेरा मारल्याचा आरोप झाल्याने त्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. त्यांचे मंत्रिपद राहिलेच तर त्यांचे खाते बदलले जाऊ शकते. मंत्रिमंडळातील काही निष्क्रिय मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. फेरबदलासाठी शिवसेनेतही हालचाली सुरू आहेत. सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला तर त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती व्हावी म्हणून शिवसेनेच्या काही प्रमुख आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला मिळालेल्या खात्यांपैकी उद्योग हे सर्वात महत्वाचे खाते आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही या खात्यावर डोळा आहे.
बैठकीला कोण कोण नेते उपस्थित?
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते.