पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:54 PM2019-09-04T12:54:14+5:302019-09-04T13:40:20+5:30
मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पीक विम्याचा मुद्दा पुढे करत शिवसेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर विधानसभेत युती होणारच असे म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनांतर्गत दिलासा मिळाल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा करत आहे.
विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती होणार असल्याचे बोलले जात असले तरीही, शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गेली पाच वर्षे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आत पीक विम्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पीक विम्यावरून परस्परविरोधी भूमिका असल्याचे समोर आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत होते. तर दुसरीकडे त्यांच्याच सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेकदा, खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जन आशीर्वाद यात्रेतून केला होता. नुकसानग्रस्त शेतकरी हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा तुमच्या गावाचे नुकसान झाले नाही, केवळ तुमच्या शेताचे झाले, अशी उत्तरे कंपन्यांनी दिली असल्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता.
भाजप-सेनेत युतीसाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न होत असले तरीही, मात्र शिवसेनेकडून भाजपवर टीका सुरूच आहे. आधी पीक कर्ज, पीक विमा आणि त्यातच आता आर्थिक मंदीचा मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षामधील परस्परविरोधी भूमिका पुन्हा समोर आली आहे.