पेशवाई झोपेने फडणवीस गारद
By Admin | Published: February 18, 2017 03:49 PM2017-02-18T15:49:19+5:302017-02-18T16:12:38+5:30
पुणेकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने संपूर्ण मैदान मोकळं पडलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पुणेकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने संपूर्ण मैदान मोकळं पडलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन सभा रद्द झाल्याचं सांगताना समन्वयाचं कारण दिलं. मात्र गर्दी नसल्यानेच सभा रद्द झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी पोहोचले तेव्हा संपूर्ण मैदान मोकळं पडलं होतं. दुपारच्या वेळी ठेवण्यात आलेल्या या सभेला पुणेकर आलेच नाहीत.
मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही सभा सुरु करण्यात आली नव्हती. तोपर्यंत मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द करत पिंपरी चिंचवडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.
I have cancelled my public meeting at Pune due to miscommunication of time of rally. I regret for the same. Heading towards Pimpri Chinchwad
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 18, 2017