फडणवीस सरकारने फक्त शेतक-यांचा शिरच्छेद बाकी ठेवलाय - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 22, 2017 08:12 AM2017-05-22T08:12:47+5:302017-05-22T08:12:47+5:30

. बुद्धिबळाचे डाव रचून विजय प्राप्त करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गळ्यास नख लावण्याचा प्रयत्न करून पाहावाच! असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दिले आहे.

The Fadnavis government has left only the beleaguered farmers - Uddhav Thackeray | फडणवीस सरकारने फक्त शेतक-यांचा शिरच्छेद बाकी ठेवलाय - उद्धव ठाकरे

फडणवीस सरकारने फक्त शेतक-यांचा शिरच्छेद बाकी ठेवलाय - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. बुद्धिबळाचे डाव रचून विजय प्राप्त करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गळ्यास नख लावण्याचा प्रयत्न करून पाहावाच! असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दिले आहे. मनात अखंड महाराष्ट्राचा विचार नाही व महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न आहे ते मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचे बळी घेत आहेत. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 
 
समृद्धी महामार्गास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट’चा दर्जा मिळाल्याने सरकारी यंत्रणेच्या अंगात ‘बाहुबली’ संचारला आहे. हे बाहुबली अरेरावी मार्गाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेत आहेत. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या लाठयाकाठ्यांनी मारले जात आहे. सरकारी कामात अडथळे आणाल तर तुरुंगात सडवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 
 
आता फक्त या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा शिरच्छेद करण्याचेच काय ते बाकी आहे. मुख्यमंत्री फडणवीस, तुमच्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा आहे, पण मागे असलेला खरा चेहरा शेतकऱ्यांचे अश्रू आणि आक्रोश पाहून हसतो आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या म्हणीचा अर्थ महाराष्ट्राच्या ‘मुख्य’ राज्यकर्त्यांना समजावून सांगायची वेळ आली आहे. नागपूर ते मुंबई अशा समृद्धी महामार्गाबाबत तेच म्हणता येईल. हा महामार्ग व्हायलाच पाहिजे म्हणून सरकारी यंत्रणा ज्या दहशतवादी मार्गाचा अवलंब करीत आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. समृद्धी महामार्गास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी म्हणजे ‘ड्रीम प्रोजेक्ट’चा दर्जा मिळाल्याने सरकारी यंत्रणेच्या अंगात ‘बाहुबली’ संचारला आहे. हे बाहुबली अरेरावी मार्गाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेत आहेत. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या लाठ्य़ाकाठ्यांनी मारले जात आहे. सरकारी कामात अडथळे आणाल तर तुरुंगात सडवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 
 
- आता फक्त या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा शिरच्छेद करण्याचेच काय ते बाकी आहे. मुख्यमंत्री फडणवीस, तुमच्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा आहे, पण मागे असलेला खरा चेहरा शेतकऱ्यांचे अश्रू आणि आक्रोश पाहून हसतो आहे काय? हजारो शेतकऱ्यांनी ‘समृद्धी महामार्गा’विरोधात बंड केले आहे. त्यांना त्यांची काळी आई विकायची नसताना तुम्ही आईस विकायला भाग पाडत असाल तर तुमची नियत ठीक नाही. सीमेवर हिंदुस्थानी जवानांचे शिरच्छेद झाले. त्या अपमानाचा बदला ज्यांना आजपर्यंत घेता आला नाही त्यांनी महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरवू नये. भिवंडी, सिन्नर, संभाजीनगरपासून पुढे ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकार दडपशाहीचे मार्ग वापरून ताब्यात घेत आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश नाशिकच्या कृषी अधिवेशनात आम्ही ऐकला. म्हणूनच आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
- शिवसेना या शेतकऱ्यांसाठी तानाजीच्या ढालीसारखे लढेल. अर्थात राज्याच्या ‘मुख्य’ राज्यकर्त्यांच्या कानाचे पडदे शेतकऱ्यांच्या आक्रोशाने फाटू नयेत याचेच आम्हाला दुःख होत आहे. शेतकरी महाराष्ट्रात आधीच आत्महत्या करीत आहेत. त्या आत्महत्यांमध्ये समृद्धी महामार्गामुळे भर पडणार आहे. सरकारला आपला महाराष्ट्र आत्महत्यांच्या बाबतीत ‘गिनिज बुका’त नेऊन ठेवायचा आहे काय? साम, दाम, दंड, भेद आणि हिटलरच्या गोबेल्स नीतीने तुम्हाला समृद्धी महामार्गासाठी मराठी शेतकऱ्यांची थडगी बांधता येणार नाहीत. नाशिकच्या कृषी अधिवेशनातून म्हणे ‘समृद्धी’ पीडित शेतकरी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने निघून गेले असे धादांत खोटे छापणारे कोणाच्या हुकूमावरून हे शेतकीविरोधी धोरण चालवीत आहेत. नाशिकच्या कृषी अधिवेशनात शेतकऱ्यांनी मुठी आवळून समृद्धी महामार्गास विरोध केला व आम्ही त्या मुठीमागच्या मनगटांना बळ दिले. विकासाला विरोध करण्याचा करंटेपणा आम्ही कधीच केला नाही, तो आमचा संस्कारही नाही. शिवसेनेची ती शिकवणही नाही. मुंबई-पुणे सहापदरी महामार्ग हा शिवसेनाप्रमुखांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होताच. 
 
- नितीन गडकरी यांनी तो पुढे नेला, पण पनवेलपासून पुण्यापर्यंत शेतकरी रस्त्यावर आला आणि विरोध केला असे झाले नाही. मुंबई- नाशिक महामार्गाबाबत तेच म्हणावे लागेल. विकासात अडथळे आणले असते तर मुंबईसह राज्यभरात शेकडो पूल व फ्लायओव्हर्स झालेच नसते. विकास ही लोकांची व राज्याची गरज आहे. मात्र सुपीक जमिनीवर शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास पुरुषाचा मुकुट डोक्यावर मिरवता येणार नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आधी रोखा. त्यांना कर्जमुक्ती हवी आहे. त्या कर्जमुक्तीपासून पळ काढणारे शेतकऱ्यांच्या जमिनी दहशतीने हिसकावून घेतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. ही समृद्धी नसून बरबादीच आहे.
 
- ‘आमचा बाप कन्यादानापर्यंत तरी जिवंत राहू द्या’ असा आक्रोश शेतकरीकन्यांनी नाशकातील अधिवेशनात केला तेव्हा तापलेला सूर्यही रडला असेल, मग सरकारलाच पाझर का फुटू नये? पन्नास हजार कोटींचा समृद्धी महामार्ग म्हणजे मर्जीतल्या पन्नास ठेकेदारांची धन आहे. समृद्धी व ठेकेदारांच्या कल्याणापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करा. हाच खरा राजधर्म आहे. सरकारला समृद्धी महामार्गावरून शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रा काढायच्या आहेत काय? सरकारच्या मनात पाप आहे. ज्यांच्या मनात अखंड महाराष्ट्राचा विचार नाही व महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न आहे ते मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचे बळी घेत आहेत. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. बुद्धिबळाचे डाव रचून विजय प्राप्त करणाऱयांनी शेतकऱ्यांच्या गळ्य़ास नख लावण्याचा प्रयत्न करून पाहावाच!

Web Title: The Fadnavis government has left only the beleaguered farmers - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.