...तर फडणवीस यांनी 'या' क्षेत्रात करिअर केलं असतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:22 IST2018-09-08T23:12:12+5:302018-09-09T07:22:20+5:30
अगदी कमी वयात नगरसेवक, महापौर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला राजकारणात फारसा रस नव्हता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच यावर भाष्य करत राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला घडलेले काही किस्से सांगितले.

...तर फडणवीस यांनी 'या' क्षेत्रात करिअर केलं असतं
मुंबई: अगदी कमी वयात नगरसेवक, महापौर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला राजकारणात फारसा रस नव्हता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच यावर भाष्य करत राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला घडलेले किस्से सांगितले. मला वकील होण्याची इच्छा होती. त्या काळ्या कोटबद्दल मला खूप आकर्षण होतं, अशा शब्दांमध्ये त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल भाष्य केलं. आयुष्यात कोणती गोष्ट करता आली नाही, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला त्यांनी वकिली असं उत्तर दिलं. महाविद्यालयात शेवटच्या वर्षात असताना मी नगरसेवक झालो. मला वकिली करायची खूप इच्छा होती. त्यानुसार अभ्यासदेखील सुरू केला होता. श्रीहरी अणे यांच्या ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. पण मी नगरसेवक असल्याने लोक तिकडे गटार, पाणी असे प्रश्न घेऊन यायचे. अणे यांनी कधीही त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. मात्र, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणं योग्य नाही, असं मला वाटलं. मग मी तिथे काम करणं सोडलं आणि मग प्रॅक्टिसदेखील करता आली नाही. यामुळे वकिली करण्याचं स्वप्न अधुरं राहील, अशा आठवणी फडणवीस यांनी सांगितल्या.