फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:11 AM2022-06-12T05:11:20+5:302022-06-12T05:11:57+5:30

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीन जागा निवडून आणण्याचा अशक्यप्राय प्रयोग यशस्वी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...

Fadnavis hits Uddhav Thackeray Mahadik 6th seat won by bjp | फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

googlenewsNext

मुंबई :

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीन जागा निवडून आणण्याचा अशक्यप्राय प्रयोग यशस्वी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे यांना सहज निवडून आणत तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय फडणवीस यांनी अक्षरश: खेचून आणला.

१७० आमदारांचे प्रचंड बळ असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेला अपक्ष व लहान पक्षांच्या आमदारांची मदत घेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा बिनचूक पॅटर्न राबवून फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची सहावी जागा जिंकत हादरा दिला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी जिंकले खरे, पण शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव घडवून आणत फडणवीस यांनी राजकीय कौशल्य दाखवून दिले. बैठकांवर बैठकांचा जोर लावत या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या महाविकास आघाडीची हवाच त्यांनी काढून घेतली. बलाढ्य महाविकास आघाडीला गाफील ठेवत फडणवीस जिंकले. महाविकास आघाडीमध्ये एकसे एक दिग्गज नेते असताना त्यांना सहावी जागा गमवावी लागली. 

अंकगणित साधत केला चमत्कार
पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची ४८ मते मिळतील याची दक्षता फडणवीस यांनी घेतली. धनंजय महाडिक यांना पहिल्या पसंतीची २७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना ३३ मते पडली. तेव्हा पवार जिंकले अशी हवा पसरली, पण काहीच मिनिटांत ती निघून गेली. फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन इथेच कामाला आले. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते ज्या उमेदवाराला मिळतात त्यांची दुसऱ्या पसंतीची मते आधी मोजली जातात. त्यानुसार महाडिक यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली गेली. 

पहिल्या पसंतीचा कोटा ४१ मतांचा होता. मात्र, गोयल आणि बोंडे यांना मिळालेली पहिल्या पसंतीची प्रत्येकी सात मते महाडिक यांच्याकडे वळली व ४१ चा कोटा पूर्ण करून ते जिंकले. त्यामुळे संजय पवार यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ येण्याआधीच महाडिकांच्या विजयाचा गुलाल उधळला गेला.

फडणवीसांचा चमत्कार; शरद पवारांकडून कौतुक
- चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसे आपलीशी केल्याने त्यांना यश आले, अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. 
- ते म्हणाले की, या निकालामुळे आघाडी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तिन्ही पक्षांपैकी कोणाचेही मत फुटलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळाले ते अपक्ष आमदाराचे होते. त्यांच्याकडील काही लोक पूर्वी आमच्याकडे होते. भाजपसोबत एरवी असलेल्या आमदाराने मला सांगूनच पटेल यांना मत दिले. त्यामुळे मी या गोष्टींमध्ये शब्द टाकला नाही. 
- सेनेकडे दुसऱ्या जागेसाठी संख्याबळ नव्हते तरीही ठाकरे यांनी जोखीम घेतली, आता विधानपरिषद व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल एकत्र बसून चर्चा करू.

शिवसेनेचे ‘वर्षा’वर चिंतन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पराभवाच्या कारणाची चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर शनिवारी रात्री शिवसेना नेते, मंत्र्यांची बैठक घेतली. संजय राऊत यांनी हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडीसोबत असलेल्या तीन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला मत दिले नसल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. 

असे जमले भाजपचे गणित
1, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकही मत फुटले नाही असा दावा खा. संजय राऊत यांनी केला. आघाडीसोबत असलेले अपक्ष आणि लहान पक्षांनी त्यांची साथ सोडत फडणवीस यांच्यासोबत जाणे पसंत केले. ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन दिवस शिवसेनेसोबत असलेल्या काही आमदारांनी कमळ फुलवले. 

2, भाजपकडे १०६ व अपक्ष व लहान पक्षांचे ७ असे ११३ आमदार होते. मात्र, त्यांना पहिल्या पसंतीची १२३ म्हणजे १० मते जास्त मिळाली. 
आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यास प्राधान्य देत काँग्रेसने पहिल्या पसंतीची ४४, तर राष्ट्रवादीने पहिल्या पसंतीची ४३ मते घेतली. त्यामुळे शिवसेनेला खड्डा पडला. राष्ट्रवादीला आणखी दोन आणि काँग्रेसला तीन मते शिवसेनेस देणे शक्य होते. अर्थात आमच्याकडील अतिरिक्त मते आम्ही शिवसेनेला दिली, असा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. 
3, भाजपचे लक्ष्य असलेल्या संजय राऊत यांना धनंजय महाडिक यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. 

Web Title: Fadnavis hits Uddhav Thackeray Mahadik 6th seat won by bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.