फडणवीस-शिंदे यांची बडोद्यात शहांशी चर्चा! सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र केला इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:10 AM2022-06-26T06:10:10+5:302022-06-26T06:11:02+5:30
दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री बडोदा (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. फडणवीस हे संध्याकाळच्या सुमारास आधी इंदूरला (मध्य प्रदेश) गेले. तेथे ते दोन तास देवदर्शनासाठी थांबले आणि तिथून विमानाने बडोद्याला पोहोचले. गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे हे रात्री बडोद्याला पोहोचले.
दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बातमी बद्दल एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नकार किंवा हाेकार कळवलेला नाही.
त्याची पुनरावृत्ती नको
- २०१९ मध्ये फडणवीस-अजित पवार सरकारचा प्रयत्न फसला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.
- एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात परत जाणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी शहा यांना यावेळी दिल्याचे सांगण्यात येते.
- यानंतर फडणवीस शनिवारी सकाळी मुंबईला परतले तर शिंदे सकाळी गुवाहाटीला रवाना झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अशी भेट झाल्याचा इन्कार केला.