फडणवीस सरकारने सावध रहायला हवे - उद्धव ठाकरेंचा इशारा

By admin | Published: October 15, 2016 11:30 AM2016-10-15T11:30:01+5:302016-10-15T11:31:45+5:30

राज्यात ठिकठिकाणी निघणा-या मोर्चांमुळे वातावरण तापलेले असून हे मोर्चे राज्य सरकारसाठी हाय अलर्टचा इशारा आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Fadnavis should be cautious about the government: Uddhav Thackeray's warning | फडणवीस सरकारने सावध रहायला हवे - उद्धव ठाकरेंचा इशारा

फडणवीस सरकारने सावध रहायला हवे - उद्धव ठाकरेंचा इशारा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - ' राज्यात ठिकठिकाणी निघणा-या मोर्चांमुळे वातावरण तापलेले असून हे मोर्चे राज्य सरकारसाठी हाय अलर्टचा इशारा आहे. त्यातच नाशिकमध्ये एका प्रकरणात हिंसक आंदोलन झाले, जानकरांच्या विधानामुळे तापलेल्या वातावरणात भर पडली आहे. ही तोडफोड म्हणजे सहज झालेला उद्रेक नसून पडद्यामागे काहीतरी शिजते आहे ' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 
राज्यभरातील मराठा मोर्चा, विजयदशमीच्या दिवशी भगवानगडावरील महादेव जानकरांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर केलेली टीका तसेच नाशिकमध्ये झालेला हिंसाचार या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ' सामना'च्या अग्रलेखातून सरकारला सावधानता बाळगायचा इशारा दिला आहे. ' महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते एखादे राजकीय षड्यंत्र आहे काय? की राज्य अस्थिर करायचे आणि पेटवून द्यायचे असा विडा उचलून कोणी कामधंद्यास लागले आहे' असे सवालही उद्धव यांनी उपस्थित केला आहे. 
' हे मोर्चे सध्या शांततेत निघत असले तरी भविष्यातील वादळाची ही सुरूवात आहे' असेही त्यांनी नमूद केले आहे. ' महादेव जानकर हे आता रस्त्यावर संघर्ष करणारे नेते उरले नसून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून काही बंधने पाळायला हवीत' अशा शब्दांत त्यांनी जानकरांचेही कान टोचले आहेत. 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
>  महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते एखादे राजकीय षड्यंत्र आहे काय? की राज्य अस्थिर करायचे आणि पेटवून द्यायचे असा विडा उचलून कोणी कामधंद्यास लागले आहे? मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे शांततेत निघत असले तरी त्यामागे उद्रेक आहे. कुठे तरी काही तरी घटना घडते व एखाद्या जातीचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आक्रोश करतात. हे चित्र निदान महाराष्ट्राच्या बाबतीत तरी दुर्मिळ होते. पण अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. भविष्यातील वादळाची ही सुरुवात आहे. 
> त्यात आता महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंसक संघर्षाची भर पडली आहे. जानकर आता रस्त्यावर संघर्ष करणारे नेते उरले नसून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून काही बंधने पाळायला हरकत नाही. नगर जिल्ह्यातील भगवानगडावरील सभेत पंकजा मुंडे यांच्यापासून जोरदार प्रेरणा घेत जानकरांनी अजित पवारांवर व धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला केला. त्याचे पडसाद उमटणे साहजिकच आहे. जानकर हे अजित पवारांवर घसरले व पवारांनी बारामतीची वाट लावली असे विधान त्यांनी केले. धनंजय मुंडे हे एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे असल्याची गोळी सोडून वाद निर्माण केला. विरोधी पक्षनेतेपदाचा हा अपमान असल्याची भूमिका आता काही पुढार्‍यांनी मांडली. विधान परिषदेत यावर हक्कभंग येऊ शकतो. कारण महादेव जानकर हे स्वत: तसेच इतर बरेच मंत्री विधान परिषदेचे मेंबर आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत केलेले ‘लॉयल चमच्यां’चे विधान सगळ्यांनाच लागू होते. 
> राजकारण म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणार, थोडाफार खणखणाट होणार हे खरेच. तथापि, संघटनेचा नेता म्हणून बोलणे आणि मंत्री म्हणून बोलणे यातील फरक लक्षात ठेवण्याचा सूज्ञपणा दाखवला तर अनेक गडबडी टळू शकतात. जानकरांनी याचे भान राखले असते तर त्यांची फसगत झाली नसती. भगवानगडावरील भाषणानंतर जानकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चवताळले. तेव्हा ‘रासप’ कार्यकर्त्यांनी पुण्याच्या बारामती हॉस्टेलात जाऊन शरद पवारांच्या तसबिरीवर शाईफेक करावी हे योग्य नाही. मतभेद असले तरी शरद पवार हे ज्येष्ठ व मोठे नेते आहेत. राजकारणातील त्यांची उंची मोठीच आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारीच पवारांशी चर्चा केली व लगेच त्यांच्या छायाचित्रांवर शाईफेक झाली ही राज्याची परंपरा नाही. बारामती हा देशातील आदर्श तालुका आहे व तेथे विकासाचे चांगले प्रयोग पवार यांनी केले. 
> संपूर्ण महाराष्ट्राचे बारामती करण्याची क्षमता असूनही तसे पवारांकडून झाले नाही हा आमचा नेहमीच टीकेचा विषय ठरला. भांडण अजित पवारांशी होते, पण शाई शरद पवारांच्या छायाचित्रावर फेकली. हा संघर्ष रस्त्यावर आला व तोडफोडीचे प्रकार त्यामुळे वाढले. महाराष्ट्राचे सामाजिक मन यामुळे भंग पावले. मराठा मोर्चे निघत आहेत व तो एक प्रकारे सरकारला ‘हाय अ‍ॅलर्ट’चा इशारा आहे. यापुढे बहुजन-दलित असे विराट मोर्चे काढण्याची घोषणा होऊन त्यांच्या तारखा जाहीर झाल्या. ‘एकच गर्व-बहुजन सर्व’ अशा घोषणा सुरू आहेत. मोर्चांमुळे वातावरण तापलेच आहे. त्यात जानकर यांनी केलेल्या विधानाने ठिणग्या पडल्या. नाशिक येथील एका प्रकरणात हिंसक आंदोलन झाले, बारामती हॉस्टेलातील शाईफेक, जानकर-पवारांतील संघर्ष, त्यातून झालेली तोडफोड हा सहज उद्रेक नसून पडद्यामागे काहीतरी शिजते आहे व रटरटते आहे. सरकारने सावध राहायला हवे. 
 

Web Title: Fadnavis should be cautious about the government: Uddhav Thackeray's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.