फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:54 AM2022-07-01T10:54:39+5:302022-07-01T10:56:15+5:30

Sanjay Raut : आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Fadnavis should have shown a big heart two and a half years ago - Sanjay Raut | फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

Next

मुंबई : राज्यातील नाट्यमय घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. तर मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे उजवे हात असून आता दोघांना एकत्र राज्याचा कारभारी पुढे न्यायचा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की,  त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युती झाली असती तर आज ते मोठ्या पदावर असते. त्यावेळी त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं. मात्र फडणवीस यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसते. शिवसेना फोडण्याचा प्लॅन त्यांनी पूर्ण केला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे सेनेचे सुत्र आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच, पहिल्या दिवसापासून सरकार पडेल असे कोणतही वक्तव्य करणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. याशिवाय, शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने घेतले असेल तर त्याचा आनंद आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Read in English

Web Title: Fadnavis should have shown a big heart two and a half years ago - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.