Maharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:36 AM2019-06-17T05:36:56+5:302019-06-17T06:35:23+5:30
जातीय व विभागीय संतुलन; कुणबी, माळी, तेली समाजाला स्थान
- यदु जोशी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करताना ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत प्रतिनिधीत्वच नसलेल्या कुणबी आणि माळी या दोन मोठ्या समाजांना स्थान देण्यात आले. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत डीएमके म्हणजे दलित-मुस्लिम-कुणबी असा फॉर्म्युला करून भाजप-शिवसेनेविरुद्ध मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न विदर्भात झाला होता. त्या समीकरणाला तडाखा देत आज विदर्भातील कुणबी समाजाच्या तीन नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यातील दोघे कॅबिनेट तर एक राज्यमंत्री आहे.
बुलडाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले डॉ. संजय कुटे, २००९ मध्ये अपक्ष, तर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेले वरुड-मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे या कुणबी समाजाच्या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद याच समाजाचे भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली.
भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर हे कुणबी समाजाचे. कृषिमंत्री असताना त्यांचे निधन झाले तेव्हापासून मंत्रिमंडळात या समाजाला प्रतिनिधित्व नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील कुणबी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा बॅकलॉग भरून काढला आणि तब्बल तीन मंत्री पदे या समाजाला दिली. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस कुणबी समाजाची मोठी मतदारसंख्या असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरचे चौथ्यांदा आमदार आहेत.
या सरकारमध्ये आतापर्यंत माळी समाजालादेखील प्रतिनिधित्व नव्हते पण आज औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद देऊन या समाजाला संधी देण्यात आली. अतुल हे औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे पुत्र आहेत. तेली, माळी व कुणबी (टीएमके) हे ओबीसी प्रवर्गात येतात. फेरबदलात राजकीय अनुभव हा निकषही लावण्यात आला.
फडणवीस मंत्रिमंडळात आता तेली समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री झाले आहेत. ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे या समाजाचे असून आता या समाजाचे मोठे नेते आणि तैलिक महासभेशी वषार्नुवर्षे निगडीत असलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने मंत्रिपद दिले.
राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार आणि तानाजी सावंत हे मराठा समाजाचे तीन कॅबिनेट मंत्री झाले तर राज्यमंत्री बाळा भेगडे हेही मराठा समाजाचे आहेत. सुरेश खाडे आणि अविनाश महातेकर हे दलित समाजाचे नेते अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्री झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डच्चू देताना मुंबईतील भाजपचे आमदार योगेश सागर यांना राज्यमंत्रीपद देऊन गुजराती प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात राखण्यात आले आहे.
पुण्याचे एक मंत्रीपद कमी
पश्चिम महाराष्ट्रातील दोन मंत्री कमी झाले आणि दोघे व नवीन आले. पुण्याचे गिरीश बापट अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते ते खासदार झाले आणि पुण्याचेच असलेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना डच्चू देण्यात आला. आता सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद तर पुणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातून दोन मंत्री होते आता भेगडे हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री असतील. कोकणाला नवीन मंत्रीपद मिळाले नाही.
सर्वच्या सर्व भाजप- शिवसेनेचे आमदार असलेल्या नाशिक शहराला मात्र मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने एक कॅबिनेट मंत्रीपद वाढले. मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा वाटा दोन्ही वाढला या विभागातील जयदत्त क्षीरसागर कॅबिनेट तर अतुल सावे राज्यमंत्री झाले.
मुंबईचा वाटा वाढला : मुंबईतून आतापर्यंत भाजपचे प्रकाश मेहता, विनोद तावडे व विद्या ठाकूर हे तीन मंत्री होते आज मेहता यांना वगळण्यात आले. आशिष शेलार यांना कॅबिनेट तर योगेश सागर व अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रीपद दिल्याने मुंबईतील भाजप व मित्रपक्षाच्या मंत्र्यांची संख्या आता पाच झाली आहे. याशिवाय शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, रवींद्र वायकर हे चार मुंबईकर मंत्री आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मांड पक्की केली
गेली साडेचार वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आणून मंत्री करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे राजकीय यश मानले जाते. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सवरा (कॅबिनेट) व तीन राज्यमंत्र्यांना वगळून सुमार वा वादग्रस्त कामगिरी असेल तर घरचा रस्ता दाखवला जाईल याची स्पष्ट जाणीव करून दिली. डॉ. संजय कुटे,डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, अशोक उईके, बाळा भेगडे अशा आपल्या निकटवर्तीयांना मंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची मांड अधिक पक्की केली. पुढची पाच वर्षेही आमचेच सरकार असेल असे ते म्हणाले आहेत.
विदर्भाला ज्यादा कॅबिनेट मंत्रिपद : विदर्भातून राजकुमार बडोले, अंबरीश राजे आत्राम आणि प्रवीण पोटे या एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्र्यांना वगळण्यात आले. डॉ. संजय कुटे डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद तर परिणय फुके यांना राज्यमंत्रीपद, यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे मंत्रिमंडळातील विदर्भातील मंत्र्यांची संख्या दोनने वाढली शिवाय दोन जादाची कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली.