महाविकास आघाडीत बिघाडी?, अपक्ष आमदारांवर गद्दारीचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:26 PM2022-06-12T17:26:58+5:302022-06-12T17:58:56+5:30
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशांत भदाणे
जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. संजय राऊतांच्या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार देवेंद्र भुसार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदेंनी महाविकास आघाडीलाच मतदान केलंय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटलांनी दिलीये.
राष्ट्रवादीकडूनआरोपांचंखंडन
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं राष्ट्रवादी काँग्रेसने खंडन केलं आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे. या निवडणुकीत मी आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा काउंटिंग एजंट होतो. माझ्यासह सुनील तटकरे आणि संजय खोडके यांच्यावर, या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं आहे किंवा नाही, याची खात्री केली आहे.” “तयामुळं त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी संशोधन झालं पाहिजे,” असा चिमटाही आमदार अनिल पाटलांनी संजय राऊत यांना काढलाय.
संजय राऊतांनी केले होते गंभीर आरोप
राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आमच्या मित्र पक्षांनीच दगाबाजी केल्याचा आरोप करत राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावेही घेतली होती. “राज्यसभा निवडणुकीत ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला नाही. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत,” असा दावा संजय राऊत यांनी केला. “काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.