जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

By admin | Published: December 25, 2015 11:01 PM2015-12-25T23:01:21+5:302015-12-25T23:43:20+5:30

राजन तेलींचा घरचा आहेर : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

Failure of public administration fumes | जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

Next

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन सध्या जनतेला ओरबाडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. यामध्ये योग्यवेळी प्रशासनाने बदल करावा, अन्यथा आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा घरचा आहेर माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. ही मनमानी जनतेला वेठीस धरणारी असून, जिल्ह्यातील अधिकारी डंपर व्यावसायिकांकडून तसेच वाळू, खडी, आदी व्यवसायांना नियमांच्या बाहेर जाऊन दंड आकारतात. यामुळे प्रसंगी डंपर मालक व चालक आत्महत्या करतील. मग याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला.
प्रशासन कशाप्रकारे दंड आकारते, याचे प्रत्येक तालुक्यातील पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतर प्रशासनाच्या वागणुकीत फरक पडला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे; पण अधिकाऱ्यांनी मार्चपूर्वी पैसे खर्च करायला पाहिजेत. जर ते खर्च केले नाहीत, तर पैसे परत जातील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

राणेंनी मागे
वळून पाहावे
राजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ज्यांना सत्तेत राहूनही कोणताच विकासाचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उलट भाजप-शिवसेनेच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत असून, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शंभर कोटींचा निधी पर्यटनासाठी केंद्र सरकारने दिला असून, जिल्हा नियोजनाचा निधीही आता १२५ कोटींच्या वर गेला आहे. नारायण राणे यांनी शासनावर टीका करणे योग्य नाही. सी-वर्ल्ड तसेच चिपी विमानतळ, आदी प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण का झाले नाहीत? असा सवालही तेली यांनी उपस्थित करीत टीका करण्यापेक्षा राणेंनी मागे वळून पाहावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

Web Title: Failure of public administration fumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.