नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:04 PM2017-09-27T12:04:50+5:302017-09-27T13:25:55+5:30
पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
नालासोपारा - पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विरार स्टेशन मास्टर आणि पी. वे. विभागाच्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने वेग कमी ठेवण्याची माहिती एक्स्प्रेसच्या लोको पायलटला न दिल्याने विरार स्टेशन मास्तर बिपीनकुमार सिंह आणि पी. वे. विभागाचे अधिकारी शेख अब्दुल रहीमवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबई शहरात 20 सप्टेंबर रोजी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होते. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प्रेसचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. नालासोपारा स्थानकातून जलदगतीनं जाणा-या एक्स्प्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर बुधवारी तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये, मुंबईत झालेल्या पावसामुळे नालासोपारा स्थानकात रुळावर पाणी साचलेले आहे. मात्र, साचलेल्या पाण्यातूनही मोटरमननं ही एक्स्प्रेस बुलेटप्रमाणे चालवल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरसह फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर हा व्हि़डीओ 'सुपरफास्ट' गतीने व्हायरल झाला होता. या व्हिडीओबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारलं असता, त्यांनी व्हिडीओतील नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेस ओळखणे शक्य नसल्याचे सांगितले होते.
नेमके काय घडले नालासोपारा स्थानकात?
20 सप्टेंबरच्या दिवशी, नालासोपारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर जलदगतीने एक्स्प्रेस आली व रेल्वे रुळावर साचलेले पाणी फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडाले. स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाइल कॅमे-यामध्ये कैद केला. मुळात रुळावर पाणी असतानादेखील जलदगतीने एक्स्प्रेस घेऊन जाणे, हे धोकादायक आहे. हा व्हिडीओ पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारले असता त्यांनी स्थानक व एक्स्प्रेस ओळखणं शक्य नसल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही असतानादेखील रेल्वे प्रशासनाला या घटनेचा 12 तासांनंतरही छडा लावणं शक्य झालं नव्हतं. . यामुळे पूर्ण स्थानकाच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.
प्रशासन म्हणालं होतं 'स्थानक/एक्स्प्रेसची ओळख पटलेली नाही'
जलद गतीनं जाणा-या एक्स्प्रेसची ही घटना बुधवारी सकाळी पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर घडलेली आहे. मात्र नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेसची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली होती.
'स्थानकाची ओळख पटली नाही म्हणणं चुकीच'
मुळात मुंबईमधील रेल्वे स्थानकामधील अनेक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमाने उघडकीस येतात. वृत्तवाहिन्यामध्ये दिसत असताना देखील रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही नाही, स्थानकाची ओळख पटलेली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. - समीर झवेरी , रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता