अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास विद्यार्थ्यांवर‘कोरोना बॅच’चा शिक्का लागण्याची भीती; त्यामुळे परीक्षा घ्या, सीईटी नको
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:09 PM2020-06-12T19:09:12+5:302020-06-12T19:10:02+5:30
विद्यार्थी हितासाठी परीक्षा घ्यायला हव्यात ...
पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास त्यांच्यावर ‘कोरोना बॅच’चा शिक्का बसेल. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश तसेच नोकरीमध्ये त्यांना अडचणी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी या परीक्षा घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यंदा रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी द्यावी, अशी ठाम भूमिका शहरातील चार मोठ्या शैक्षणिक संस्थांनी मांडली आहे. तसेच यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना राज्यातील शिक्षणसंस्थांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला राज्यपालांसह भाजपा तसेच अन्य काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता शैक्षणिक संस्थाही या निर्णयाविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ?ॅड. एस. के. जैन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुध्दे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन गोºहे यांनी याबाबत एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याला परवानगी दिल्यास आम्ही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
ह्यपरीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिल्यास नोकरी, व्यवसाय आणि पुढील शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात. कोरोना बॅच अशा शिक्का त्यांच्यावर बसेल. त्यामुळे केंद्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा पदव्या दिल्या तर भविष्यात संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या राहणे-खाण्याचा खर्च करण्यासही संस्था तयार आहेत. तसेच सुरक्षित अंतर व इतर आवश्यक काळजी घेऊन परीक्षा घेता येतील. शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यात प्रवेश परीक्षा घेतल्यास सत्र सुरू होण्यास नवीन वर्ष उजाडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे यावर्षी सर्व प्रवेश परीक्षा रद्द करून टेबल पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
--------------
बॅकलॉगचे ५४ टक्के विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा घेतल्या जाार आहेत. मग उर्वरीत विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घ्यायला हव्यात. लोकप्रिय निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळू नये. तसेच यंदा सीईटीचाही आग्रह नको.
- डॉ. शरद कुंटे, अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
--------------
परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेईल. त्यादृष्टीने तयारी केली जाईल. विद्यापीठांना डावलून निर्णय घेता येणार नाही. सर्वांना विश्वासात घ्यावे.
- अॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी
-------------
आमच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा घेण्यासही शासन मान्यता देत नाही. दोन महिने वेळ दिल्यास विद्यार्थ्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करून परीक्षा घेऊ. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
- राजन गोºहे, अध्यक्ष, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
-----------
परीक्षा घेण्याची आमचीही तयारी आहे. याबाबत सर्वांनी एकत्रित येऊन विचार केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या जातील.
- राजीव सहस्त्रबुध्दे, अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी