दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून मिळणार रास्त धान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 07:10 PM2019-02-09T19:10:28+5:302019-02-09T19:15:13+5:30
राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ठिकाणच्या रास्त धान्य दुकानातून धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थलांतर झालेल्या ठिकाणच्या कोणत्याही रास्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे घोषित केले आहे. सध्या राज्यातील अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरीत केले जाते. या यंत्राच्या वापरामुळे कोणत्याही दुकानातून धान्य घेणे शक्य आहे. तशी सुविधा देखील ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत शहरी आणि निमशहरी भागात स्थलांतर होत असते. या काळात शिधापत्रिकेवरील धान्यापासून नागरीक वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थलांतरणाच्या ठिकाणी देखील शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा व्हावा यासाठी दुष्काळी भागातील स्थलांतरीतांसाठी कोणत्याही दुकानातून धान्य मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे.