वाहन परवान्यासाठी बनावट दाखले
By admin | Published: May 7, 2014 08:35 PM2014-05-07T20:35:32+5:302014-05-07T21:40:59+5:30
वाहन परवाना काढण्यासाठी जास्त शिक्षण झाल्याचा तसेच शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करणा-याविरुद्ध आरटीओने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.
पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी जास्त शिक्षण झाल्याचा तसेच शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करणा-याविरुद्ध आरटीओने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परशुराम रंगय्या भंडारी (वय १९, रा. नलावडे चाळ, सुतारवाडी, पाषाण) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक शितल महेश गोसावी (वय ३२, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. भंडारी याने हलक्या वाहनांच्या शिकाऊ परवान्यासाठी आरटीओकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत त्याने रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडुस, ता. खेड या शाळेची ९ वी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता. ही कागदपत्रे बनावट असल्याचे पडताळणीमध्ये उघड झाले. भंडारीचे शिक्षण 5 वी पर्यंत झालेले असून तो कर्नाटकात शिकलेला असल्याचेही तपासात पुढे आल्यावर आरटीओच्यावतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.