खरेदी खतासाठी बनावट दाखले

By Admin | Published: April 6, 2017 12:41 AM2017-04-06T00:41:29+5:302017-04-06T00:41:29+5:30

पुण्यातील काही लँडमाफियांनी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जमीनमालकांचे बनावट मृत्यूचे दाखले बनवून खरेदीखते केल्याची मोठी चर्चा आहे.

Fake certificates for purchase manure | खरेदी खतासाठी बनावट दाखले

खरेदी खतासाठी बनावट दाखले

googlenewsNext

बी़ एम़ काळे,
जेजुरी- पुरंदर तालुक्यातील बेलसर परिसरात पुण्यातील काही लँडमाफियांनी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जमीनमालकांचे बनावट मृत्यूचे दाखले बनवून खरेदीखते केल्याची मोठी चर्चा आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी या माफियांना केलेल्या अर्थपूर्ण सहकार्याची व या खरेदी खतांची चौकशी व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
पुणे शहर चारही बाजूने वाढते आहे. यामुळे शहरालगतच्या तालुक्यातील जमिनींना वाढती मागणी होऊ लागली आहे. पुणे शहरातील लँडमाफियांनी आता लगतच्या तालुक्यातील जमिनींचा खरेदी-विक्रीचा सपाटा लावलेला आहे. पुरंदर तालुक्यात यापूर्वी दुष्काळीपरिस्थिती असल्यामुळे जमिनी स्वस्तात मिळत होत्या. मात्र, आता तालुक्यात उभारले जाणारे विमानतळ, जेजुरीनजीक विस्तारीत होणारी एमआयडीसी, त्याचबरोबर येऊ घातलेले गुंजवणीचे पाणी यामुळे लँडमाफियांच्या रडारवर आता पुरंदर तालुका आलेला आहे.
तालुक्यातील स्थानिक जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांना हाताशी धरून विक्री होऊ शकणाऱ्या जमिनींचा शोध घेण्यात येत आहे. याकामी महसूल विभागाचे कर्मचारीही या दलालांच्या दिमतीला आहेत. अगदी तलाठ्यापासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण स्वत:हून जमिनींची कागदपत्रे तयार करून दलालांना सुपूर्त करीत आहेत. यात या मंडळींचाही मोठा आर्थिक फायदा होत आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेल्या येथील काही मंडलाधिकाऱ्यांची चौकशीही सुरू आहे. तालुक्यातील बेलसर, पिंपरी हंबीरवाडी, जेजुरी, साकुर्डे, निळुंज, शिवरी आदी परिसरात अशा प्रकारचे मोठे व्यवहार झाले आहेत. काही देव संस्थानच्या जमिनीही हडप करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक दलालांकडून बेवारस जमिनींचा शोध घेतला जातो. त्या जमिनींची कागदपत्रे महसूलकडून मिळवून त्या जमिनींच्या उताऱ्यावरील मूळ व कुळ खातेदारांची माहिती मिळवली जाते. ते मिळून येत नसतील, तर त्यांचे बनावट मृत्यूचे दाखले बनवले जातात.
नावातील साम्याचा आधार घेऊन नव्याने कागदपत्रे बनवली जातात. जमिनीचे खरेदीखत बनवले जाते. अशा बोगस प्रकारातून खरेदी केलेल्या जमिनी या माफियांकडून विकसित केल्या जातात. प्लॉट पाडून वरील तालुक्यातील भविष्यात विकसित होणाऱ्या वेळवेगळ्या प्रलोभनांची जाहिरात करून मोठ्या किमतीने विक्री केली जात आहे. (वार्ताहर)
पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळाच्या विमानाच्या उड्डाणांच्या चित्राचा जाहिरातीत सर्रास वापर केला जातो. विमानतळालगत जमीन असल्याचे जाणीवपूर्वक भासवण्यात येत असल्याने दूरवरून भांडवलदार गुंतवणुकीसाठी येथे येऊ लागले आहेत. यात अनेकांची फसवणूक झाल्याचीही मोठी चर्चा आहे.यासाठी संपूर्ण महसूलची यंत्रणा या माफियांना मदत करताना निदर्शनास येत आहे. एकीकडे विमानतळासाठी जमीन भूसंपादनाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे अशा लँडमाफियांनी जमिनी हडपण्याचा प्रकार सुरू केल्याने परिसरातून असंतोष व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी व बोगस व्यवहार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Fake certificates for purchase manure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.