जळगावात बनावट नोटा छापण्याचा डाव उधळला
By admin | Published: June 1, 2017 03:22 AM2017-06-01T03:22:11+5:302017-06-01T03:22:11+5:30
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात छापण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पाचोरा येथे मंगळवारी रात्री ही धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात छापण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पाचोरा येथे मंगळवारी रात्री ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मास्टरमाइंड शिक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एक पसार झाला आहे. आतापर्यंत या टोळीने ५० लाखांच्या वर रक्कम वितरित केल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणातील मास्टरमाइंड किरण साहेबराव पाटील (२६, रा. विवेकानंद कॉलनी, भडगाव), विशाल पितांबर साळवे (२६ रा. वसाहत, पाचोरा), पवन राजेंद्र चौधरी (१९ रा. पाचोरा), दुर्योधन बाबुराव खैरनार (२३ रा. हनुमान नगर, पाचोरा), ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील (२० रा. बहीराम नगर, पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिद्धार्थ भीमराव मोरे (रा. जनता वसाहत, पाचोरा) हा पसार झाला आहे. यातील किरण गिरड ता. भडगाव येथील विद्यालयात शिक्षक, तर पवन हा मेडिकलवर हेल्पर आहे. अन्य दोघे संगणक हाताळण्यात निष्णात आहेत.
५० लाख वितरित?
पवन याच्या घरात शंभर व ५० रुपयांच्या नोटा गेल्या दीड महिन्यापासून छापल्या जात होत्या. आतापर्यंत या टोळीने ५० लाखांच्या वर रक्कम वितरित केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या घरातून एक संगणक, स्कॅनर, वेगवेगळ्या कंपनीचे दोन कलर प्रिंटर, किरण याच्याकडून लॅपटॉप, विशाल याच्या घरातून शंभराच्या २८ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा, ज्ञानेश्वर याच्याकडून शंभराच्या ७१ हजार १०० रुपयांच्या नोटा, कोरे बॉँड पेपर, कात्री, कटर, शंभराच्या २७० अर्धवट छापलेल्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शिक्षकाला पगार नाही : किरण याने एम.ए.बी.एड. व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला आहे. भडगाव येथील गिरड हायस्कूल या विनाअनुदानित शाळेत तो शिक्षक आहे. या नोकरीसाठी त्याने १५ लाख रुपये भरले, तरीही पगार मिळत नसल्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरूकेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.