तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजामध्ये अटक, अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, कागदपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:28 IST2025-01-08T15:12:51+5:302025-01-08T16:28:50+5:30
Crime News: बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तळोज्यातून अटक केली आहे.

तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजामध्ये अटक, अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, कागदपत्रे जप्त
- मंगेश कराळे
नालासोपारा- बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तळोज्यातून अटक केली आहे. आरोपीकडे अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली आहेत. या आरोपीने किती लोकांना आयकर विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
संतोष भवनच्या तांडापाडा येथील अजमेरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सफारुद्दीन खान (४९) यांच्या मुलीला आयकर विभागाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी रिंकू शर्मा व अंशु पासी या दोघांनी त्यांच्या मुलीला आयकर विभागात कामाला लावतो असे सांगितले होते. त्यांच्या मुलीला आयकर विभागाचे ओळखपत्र व ट्रेनिंगचे पत्र देऊन तिला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली होती. पेल्हार पोलिसांनी १३ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करत होते.
तपासादरम्यान रिंकू शर्मा (३३) हा आरोपी तळोज्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर २८ बनावट आयकर विभागाचे आयकार्ड, अनेक शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली. आरोपी पकडल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गर्दी केली होती. आतापर्यंत ४० ते ४२ नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना बनावट आयकर निरीक्षकाचे आयकार्ड व नियुक्ती पत्रे देऊन दोन करोड पेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला असल्याचे प्रथम दर्शनी पुढे आले आहे. आरोपीने अनेक वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यांकडे कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून काम केले असल्याने त्यांच्या व्हिजिटिंग कार्ड व फोटोसह कागदपत्रांचा गैरवापर केला आहे. आरोपीकडे सीबीआय पोलीस कमिश्नर, वरिष्ठ आयकर अधिकारी असल्याचे आयकार्ड दाखवून लोकांना गंडा घातला आहे. आरोपी एका कारवर पिवळा अंबर दिवा लावून वसई विरार परिसरात फिरून २० ते २५ जणांची फसवणूक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.