हे तर ‘फेक इन इंडिया’!

By Admin | Published: April 24, 2016 04:50 AM2016-04-24T04:50:17+5:302016-04-24T04:50:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीसाठी ‘मेक इन इंडिया’सारखी योजना सुरू केली. मात्र, एवढे दिवस झाले तरी उद्योगधंद्यांच्या निर्मितीसह अद्याप या सरकारने रोजगारनिर्मितीची

This is 'Fake in India'! | हे तर ‘फेक इन इंडिया’!

हे तर ‘फेक इन इंडिया’!

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीसाठी ‘मेक इन इंडिया’सारखी योजना सुरू केली. मात्र, एवढे दिवस झाले तरी उद्योगधंद्यांच्या निर्मितीसह अद्याप या सरकारने रोजगारनिर्मितीची भाषा केलेली नाही. परिणामी, ‘स्वच्छ भारत’ वा ‘मेक इन इंडिया’सारख्या योजना भूलथापा असून, हे मोदींचे ‘फेक इन इंडिया’ आहे, अशा शब्दांत ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने मुंबईतील सभेत मोदींवर कडाडून हल्ला केला.
विरोध आणि पोलिसांची भूमिका यामुळे कन्हैयाची मुंबईतील सभा चर्चेत आली होती. मुंबई येथील टिळकनगरातील आदर्श विद्यालयात झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. छात्र भारती या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजिलेल्या परिषदेत कन्हैयाच्या सभेपूर्वी सकाळी निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील, तीस्ता सेटलवाड आदींनीही केंद्र सरकारवर टीका केली.
सायंकाळी कन्हैयाने भाषणाची सुरुवात संत तुकाराम व अण्णाभाऊ साठे यांचा संदर्भ देत केली. तो म्हणाला, या थोर संत व नेत्यांच्या भूमीत बोलण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे. मोदी सरकार हे संघाचे सरकार आहे. आम्ही विद्यार्थी कोणाचेही शत्रू नाही. आमचे आंदोलन लूट, अन्याय व जातीव्यवस्थेविरोधात आहे. शेतकरी आत्महत्यांवर तुम्ही बोला, आम्ही गप्प बसू. पण ‘वास्को द गामा’सारख्या पृथ्वी प्रदक्षिणेत निधी वाया घालवू नका, असा टोलाही कन्हैयाने मोदींना लगावला.

...तर लोक भंगारात टाकतील
मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळासाठी निसर्गाला जबाबदार धरू नका. येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. मुळात सरकारसमोर दुष्काळ ही समस्याच राहिली नाही की काय? अशी शंका येऊ लागली आहे.
मुंबईत सर्वसामान्यांना वास्तव्य करण्यासाठी हक्काचे घर मिळत नाही. सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेते. मात्र तळागाळातल्या जनतेसाठी काम करत नाही. सामाजिक न्यायासाठी आंदोलन करणे हा या देशात गुन्हा ठरत आहे; याचेही वाईट वाटते.
गलिच्छ राजकारणाचा तिरस्कार करतो. संसदेत विरोधक नसतील पण या देशात विद्यार्थी चळवळ ही तुमची विरोधक आहे. हा देशही आता तुमच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे जनतेचे तुम्ही भले करा. अन्यथा ‘ओएलक्स’चा जमाना आहे. त्यामुळे जर तुम्ही काही केले नाही, तर लोक काहीतरी करतील, असा इशाराही त्याने दिला.

मुंबईत आंदोलन
मुंबईत विद्यार्थी आंदोलन छेडण्यात येणार असून, यासाठी दिल्लीत बैठका सुरु आहेत. मुंबईतील आंदोलन हक्कांसाठी असल्याचेही कन्हैया म्हणाला. ‘रोहित अ‍ॅक्ट ड्राफ्ट कमिटी’ बनवून तो ड्राफ्ट मंजुर करण्यात येणार असल्याचेही
त्याने सांगितले.

कन्हैया उवाच....
लढाई ब्राह्मणवाद, संघवादाविरुद्ध.
मोदी सरकार काय म्हणता? व्यक्तिकेंद्रीत पद्धत आणू नका.. केंद्र सरकार, भाजपा-संघ सरकार म्हणा!!
देशात सध्या संघाचे जुमलेबाज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक जाँबाज यांच्यात लढाई... आणि लढाईत जिंकतात ते जाँबाज!
एक बार मोदीजी खुद गटरमें उतरकर सफाई करें ,तब शुरू होगा स्वच्छता अभियान...

आमचीही ‘मन की
बात’ ऐका
सोशल नेटवर्क साईटवर प्रसिद्धीच्या मागे पडण्याऐवजी मोदी सरकारने तळागाळात काम करावे. लोकांसाठी रोजगारनिर्मिती करावी. रोजगाराची क्षमता वाढवावी.
विकासाच्या गोष्टी कराव्यात
आणि बाबासाहेबांचे नाव घेताना ‘मनुस्मृती’ जाळावी, असेही आव्हान कन्हैया याने मोदी सरकारला दिले.
सरकार कोणाचेही असो, समस्या सुटल्या पाहिजेत. नाहीतर आम्हीही ‘सेल्फ रिस्पेक्ट’ पद्धतीने ‘मन की बात’ करू, असेही तो म्हणाला.
पुण्यामध्ये रविवारी होणाऱ्या कन्हैयाच्या सभेसाठी तब्बल ४०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राजकारण आमच्यासाठी संघर्ष आहे. आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही जातीच्या बाजूने किंवा विरोधात नाही. आम्ही शोषणाच्या विरोधात आहोत. यासाठी आम्हाला तुरुंगात टाकले तरी आंदोलन सुरूच राहील. - कन्हैया कुमार

Web Title: This is 'Fake in India'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.