"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:50 PM2024-09-23T21:50:26+5:302024-09-23T21:51:43+5:30

Anil Deshmukh on Akshay Shinde Encounter : आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

"Fake Narrative of Encounter to Suppress Case", Alleges Anil Deshmukh After Akshay Shinde Killed in Encounter | "प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

Anil Deshmukh on Akshay Shinde Encounter : मुंबई : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना त्याने शेजारी असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेत गोळीबार केला, त्यावेळी पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात अक्षयचा मृत्यू झाला असून पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या प्रकरणावरून आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. तसेच, आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.

दरम्यान, अक्षय शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. याखेरीज त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना त्याने पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. 

यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वरील माहितीस दुजोरा दिला.

Web Title: "Fake Narrative of Encounter to Suppress Case", Alleges Anil Deshmukh After Akshay Shinde Killed in Encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.