बारावीच्या निकालांची बनावट वेबसाईट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 07:03 AM2020-06-13T07:03:08+5:302020-06-13T07:03:15+5:30
बारावीचा निकाल पाहण्यासाठी सोशल मीडियावर लिंक व्हायरल झाली आहे. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले नाव, आईचे नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर त्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा मेसेज येतो.
मुंबई : दहावी, बारावीचा निकाल कुठपर्यंत आला? निकाल कधी लागणार? या प्रश्नांमुळे गोंधळलेल्या पालक व विद्यार्थ्यांच्या संभ्रमात आणखी भर पडली आहे. कारण, बारावीच्या बनावट वेबसाईटचा फायदा घेत विद्यार्थी, पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक टाकला की विद्यार्थ्यांचा निकाल या वेबसाईटवर दिसत असून गुणपत्रिकेसाठी मेल करावा, असा मेसेज दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटवर मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालाची माहितीही आहे. पालक व विद्यार्थ्यांची या बनावट वेबसाईटद्वारे दिशाभूल करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न यातून केला जात असून, याला किंवा कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी सोशल मीडियावर लिंक व्हायरल झाली आहे. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले नाव, आईचे नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर त्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये कोविडमुळे आमच्याकडे पुरेसा कर्मचारी नसल्याने आम्हाला सर्व डेटा उपलब्ध करण्यात अडचण येत आहे. परंतु एका आठवड्यात गुणपत्रिका तुमच्या महाविद्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क साधा. तसेच तुम्ही उत्तीर्ण झाला आहात, तुमचे अभिनंदन! तुम्हाला अमुक टक्के गुण मिळाले आहेत. तुम्हाला गुणपत्रिका हवी असल्यास आम्हाला मेल करावा, असा मेसेज देण्यात येतो. विशेष म्हणजे या लिंकवर आपली माहिती वारंवार भरून निकाल पाहिल्यास प्रत्येकवेळी वेगवेगळे टक्के गुण दाखविण्यात येत आहेत.
दरम्यान, यासंदर्भात राज्य मंडळाशी संपर्क साधला असता, फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. दहावी, बारावीच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉट्सअॅप, फेसबुक व सोशल मीडियावर जाहीर होत आहेत. त्यावर पालकांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख मंडळातर्फे अधिकृत ईमेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रे आणि मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
कठोर कारवाईची मागणी
खोटी वेबसाईट सोशल मीडियावर जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांच्याकडे मेलद्वारे केल्याचे मुंबई विद्यापीठाचे युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.