अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला भाजीपाला, दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 06:40 PM2017-06-01T18:40:07+5:302017-06-01T18:40:07+5:30
संघर्ष, आत्मक्लेष आणि आसूड यात्रेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडूनही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोषिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 01 - संघर्ष, आत्मक्लेष आणि आसूड यात्रेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडूनही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोषिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे लागले. झोपेचे सोंग घेऊन बळीराजाचे शोषण करणाऱ्या शासनाला जाग येत नाही, तोवर आता शेतकरी स्वत:पुरतेच पिकविणार, कोणताही माल बाजारपेठेत जाणार नाही, या शब्दांत प्रहारचे संस्थापक आ.बच्चू कडू यांनी गुरूवारी शेतकऱ्यांच्या संपाचा बिगूल फुंकला. भाजीपाल्यासह दुधाचे कॅन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून प्रहारींसह शेतकऱ्यांनी शासनाविरोधातील रोष व्यक्त केला.
शासनाला यानंतरही जाग न आल्यास शेतकऱ्यांचा हा संप असाच सुरू राहील. संपकाळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, दूध आदी माल शहरात विक्रीसाठी आणू दिला जाणार नाही. आंदोलनादरम्यान कोणतेही शेती उत्पादन शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास बाजार समितीमधील हा बाजारच उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करणे, कांद्याला योग्य दर देणे, या शेतकरी हिताच्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाविरुद्ध नारेबाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनात आ.बच्चू कडू, प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मंगेश देशमुख, जोगेंद्र मोहोड, प्रदीप वडतकर, बल्लू जवंजाळ, पंकज जवंजाळ, राजेश भोंडे, गजेंद्र गायकी, दीपक धुरजड, प्रशांत आवारे, गजानन ठाकरे, दिलीप जवंजाळ, नंदी विधळे, संजय पवार आदींसह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
कुटुंबापुरतेच पिकवणार...
संप सुरू केल्यावरही सरकार सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर पुढे खरीप पेरणी बंद आंदोलन केले जाईल. हे आंदोलन दीर्घकाळ चालणार असल्याने आंदोलन कालावधीत शेतकरी फक्त स्वत:च्या कुटुंबापुरतेच पिकवतील. दूध, भाजीपाला, अंडी कशाचीही विक्री करणार नाहीत. बाजार समित्यांमधील भाजीपाला विक्रीचे व्यवहारही बंद पाडले जातील.
काय आहेत मागण्या ?
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा, शेतीला अखंडित व मोफत वीज पुरवठा मिळावा, कांद्याला भाव मिळावा, तूर खरेदी केंद्र सुरूच ठेवावे, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, दूधाला प्रतिलिटर ५० रूपये दर मिळावा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
भाजपाला सत्तेची गुर्मी..
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरीविरोधी आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शेतकऱ्यांनी संप केला तरी काही फरक पडत नाही, असे व्यक्त केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे. त्यांना आता शेतकरी ‘जशास तसे’ उत्तर देतील. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्याने ते स्वत: देखील मूळचे शेतकरी आहेत, हे विसरल्याची टीका आ. बच्चू कडू यांनी केली.
आसूड यात्रेसह अन्य काही पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केलीत. सभागृहातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार आमदारांना बोलू देत नाही. नोटाबंदी करून भाजपाने पक्षासाठी पैसा कमावला आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
- बच्चू कडू,
आमदार, अचलपूर