सोने-चांदीच्या भावात घसरण
By admin | Published: May 8, 2014 11:48 PM2014-05-08T23:48:39+5:302014-05-08T23:48:39+5:30
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टॉकिस्टांकडून मागणी कमी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली.
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टॉकिस्टांकडून मागणी कमी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. तीन दिवसांच्या तेजीनंतर सोन्याचा भाव ३५० रुपयांच्या घसरणीसह ३०,४०० रुपये प्रतितोळा झाला. दुसरीकडे चांदीचा भावही ८०० रुपयांनी कोसळून ४२,००० रुपये प्रतिकिलो राहिला. बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडरल रिझर्व्हकडून बाजार प्रोत्साहन पॅकेजमध्ये कपात करण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या सर्वांत खालच्या पातळीवर गेला. याचा देशी बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम दिसून आला. न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव १.५ टक्क्याच्या घसरणीसह १२८८.९० डॉलर प्रतिऔंस राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) १५ एप्रिलनंतर सोन्याच्या भावात ही सर्वांत मोठी घट नोंदली गेली. चांदीचा भाव १.५ टक्क्याने कमी होऊन १९.३४ डॉलर प्रतिऔंस राहिला. दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३३० रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे ३०,४०० रुपये आणि ३०,२०० रुपये प्रतितोळा झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २५,१०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ४२,००० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ८५० रुपयांनी कोसळून ४१,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)