टक्का घसरला, तरीही अव्वल
By Admin | Published: June 6, 2016 11:52 PM2016-06-06T23:52:52+5:302016-06-06T23:56:22+5:30
बीड : बारावी परीक्षेत विभागात अव्वल स्थान पटकावणाऱ्या बीडने दहावी परीक्षेतही यशाची मालिका कायम ठेवली. ९३.९० टक्क्यांसह बीड मराठवाडा
बीड : बारावी परीक्षेत विभागात अव्वल स्थान पटकावणाऱ्या बीडने दहावी परीक्षेतही यशाची मालिका कायम ठेवली. ९३.९० टक्क्यांसह बीड मराठवाडा विभागात अग्रस्थानी राहिले. गतवर्षी बीडने ९५.०२ टक्के गुणांसह विक्रमी यश मिळविले होते. यंदा एक टक्क्याने निकाल घसरला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१६ मध्ये दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. जिल्ह्यातील ४० हजार ९८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४० हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३८ हजार २६८ विद्यार्थी यशस्वी झाले. विशेष प्राविण्यासह १६ हजार ३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १५ हजार २५०, द्वितीय श्रेणीत ६ हजार १०० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्या खालोखाल ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २ हजार ४८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
बीड जिल्ह्याने मिळविलेले एकूण ९३.९० टक्के गुण हे विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता होती. दुपारी १ नंतर मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. अनेकांनी नेटकॅफे गाठून तर काहींनी मोबाईलवरुनच निकाल जाणून घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
५९९ ‘रिपीटर’ उत्तीर्ण
गतवर्षी अनुत्तीर्ण ११३३ विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये पुन्हा परीक्षा दिली. पैकी ५९९ विद्यार्थी यशस्वी ठरले तर ५३४ पुन्हा अनुत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी)