मृत व्यक्तीच्या नावे बनविले खोटे प्रतिज्ञापत्र, निरक्षर व्यक्तीची इंग्रजीत सही; BJP आमदारावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:16 AM2022-04-15T06:16:45+5:302022-04-15T06:17:03+5:30
मृताच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मायणी (जि. सातारा) :
मृताच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली.
मायणीतील वडिलोपार्जित जमीन असून तिची वहिवाट महादेव भिसे आणि त्यांचे भाऊ करीत आहेत. त्यांचे वडील पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मृत्यू झाला. वडिलोपार्जित मिळकत गट नंबर ७६९ लगत गट नंबर ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणीतर्फे तत्कालीन अध्यक्षांच्या मालकी कब्जे वहिवाटीची आहे. संबंधित मिळकत संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी सहायक संचालक नगररचना सातारा यांच्या कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याप्रमाणे संबंधित रस्त्याची रुंदी मंजूर सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार १५ मीटर इतकी आवश्यक असल्याने गट नंबर ७६९ मधून जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असणे बंधनकारक होते.
माण-दहिवडी तहसीलदार यांच्यासमक्ष ११ डिसेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्र नं. ४३००/२०२० ने नोंदले आहे. त्यात मयत पिराजी भिसे यांचे बनावट आधारकार्ड बनवून व्यक्ती उभी केली गेली.
दत्तात्रय घुटुकडे, महेश बोराटे यांना साक्षीदार दाखवले. प्रतिज्ञापत्रासाठी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याहस्ते दत्तात्रेय घुटुकडे (रा. विरळी, ता. माण) यांच्या नावे मुद्रांक घेऊन जयकुमार गोरे, दत्तात्रय घुटुकडे, महेश बोराटे आणि पिराजी भिसे यांच्यानावे प्रतिज्ञापत्र करणारी अनोळखी व्यक्तीसह पाच जणांनी भिसे कुटुंबाची फसवणूक केली आहे.
निरक्षर व्यक्तीची इंग्रजीत सही
पिराजी भिसे यांचा आधारकार्ड नंबर ९०१३ १५२० १५९५ असून, प्रतिज्ञापत्रात दिलेला आधारकार्ड नंबर ५०७२ १५७८ ८२१३ असा आहे. वडिलांचे चुकीचे नाव म्हणजे विष्णू पिराजी भिसे या नावाचे बनावट आधारकार्ड तयार केले. पिराजी भिसे हे निरक्षर असताना त्यांनी प्रतिज्ञापत्रावर इंग्रजीत सही केली आहे.