‘फासळ्यां’मुळं भेटली समृद्ध संस्कृती!

By admin | Published: October 25, 2015 09:33 PM2015-10-25T21:33:41+5:302015-10-26T00:11:57+5:30

प्रागैतिहासिक खजिना : साडेतीन हजार वर्षांपूर्वी माणमधील कारागीर होते आंतरराष्ट्रीय व्यापारात

'False' met a rich culture! | ‘फासळ्यां’मुळं भेटली समृद्ध संस्कृती!

‘फासळ्यां’मुळं भेटली समृद्ध संस्कृती!

Next

सातारा : दोन-तीन एकरांचा विस्तीर्ण माळ. तिथं कुणीच जात नाही. कारण तिथं फासळ्या सापडतात, अशी वदंता. ‘जिज्ञासूू’ नजरांनी या ‘फासळ्या’ पाहिल्या आणि त्यातूनच उलगडत गेला माण तालुक्याचा समृद्ध इतिहास. इथं सापडलेली कारागीरांची हत्यारं प्रागैतिहासिक काळातली असून, आजपासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी माणगंगेकाठी नांदत असलेल्या समृद्ध संस्कृतीची ओळख केवळ ‘फासळ्यां’मुळं पटली आहे.
फासळी हे सर्वांत लवकर नष्ट होणारं हाड. असं असताना माण तालुक्यातील ‘त्या’ गावाजवळ वारंवार फासळ्या कशा सापडतात, या कुतूहलापोटी सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांची पावलं वळली माळाकडे. फासळ्या म्हणून ज्यांचा उल्लेख होत होता, ते होते शंखापासून तयार केलेल्या बांगड्यांचे तुकडे. सामान्यत: सातवाहन काळापर्यंत अशा बांगड्या वापरल्या जात असत. परंतु शोध घेता-घेता समजलं, की इथली माणसं केवळ त्या वापरत नव्हते, तर बांगड्या बनवण्याचा कारखानाच प्राचीन काळी इथं होता.
‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे, नीलेश पंडित आणि शीतल दीक्षित ‘फासळ्यां’चा माग घेत थेट प्रागैतिहासिक काळात पोहोचले. शंखाच्या बांगड्यांशी संबंधित अनेक जुने तपशील आठवताना मेसोपोटेमिया (सध्याचा इराक) आणि सिंधू खोरे यांच्यातील प्राचीन व्यापारसंबंधांचा संदर्भ जुळला. इथं बांगड्या केवळ वापरल्या जात नव्हत्या, तर त्या तयार होत होत्या, याचे पुरावे सापडले. सूक्ष्माश्म म्हणजेच कोरीवकाम करण्याची गारेच्या दगडाची हत्यारं सापडली. ही हत्यारं पाच हजार वर्षांपूर्वी प्रचलित होती, ती ताम्रपाषाणयुगाच्या अस्तापर्यंत!
याच माळावर ‘जिज्ञासा’च्या सदस्यांना सापडला शंखाच्या आतील काढून टाकलेल्या गाभा. सूक्ष्माश्म वगळता अशा प्रकारचे पुरावे यापूर्वी जुन्नर, पैठण, नेवासा आदी ठिकाणी सापडले आहेत. माणमध्ये सापडलेल्या शंखांच्या काही तुकड्यांवर तीक्ष्ण हत्याराने खाचा पाडलेल्या आढळल्या; शिवाय गारगोटीची तीक्ष्ण हत्यारंही सापडली. या मंडळींनी प्राचीन इतिहासातील तज्ज्ञ डॉ. अभिजित दांडेकर यांच्याशी संपर्क साधला.
हे अवशेष इसवीसन पूर्व १५०० मधील असू शकतात, या तर्काला त्यांनी पुष्टी दिली असून, हत्यारे त्याहीपूर्वीची असू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)


शंखाच्या बांगड्यांचा व्यापारी इतिहास
मेसोपोटेमियाचा राजा सेरगॉन याच्या काळात सिंधू खोऱ्यातून शंखाच्या बांगड्या तिथे जहाजावरून जात होत्या, याचा तपशील उपलब्ध आहे. शंखाचा बाह्यभाग बांगडीसाठी वापरल्यानंतर उरलेल्या गाभ्यापासून लाटण्यासारखा फिरवून उमटविण्याचा शिक्का बनविला जात असे. तसे कागदोपत्री पुरावे आहेत. हडप्पा उत्खननात महत्त्वाची भूमिका बजावणारे गेन्स हायमर यांनी लिहिलेल्या ‘रोल आॅफ शेल इन मेसोपोटेमिया : एव्हिडन्स फॉर ट्रेड एक्स्चेंज विथ ओमान अँड इंडस व्हॅली’ या प्रबंधात याचा ऊहापोह केला आहे. दिलमून (सध्याचे बहारीन), मेगन (सध्याचे इजिप्त) आणि मेलुहा (सिंधू खोरे) येथून आलेल्या बोटी सेरगॉन याने ताब्यात घेतल्या आणि त्यात शंखाच्या बांगड्या होत्या, याचा उल्लेख आहे. हा व्यापार अलेक्झांडरच्या उदयापर्यंत सुरू होता आणि नंतर तो मेसोपोटेमियाकडून रोमच्या दिशेने वळला, असे मानले जाते.



सलग वस्ती
असण्याची शक्यता
माण तालुक्यात सापडलेल्या काही खापराच्या तुकड्यांवर रेषांची नक्षी असून, त्यावरून ही भांडी चाकावर तयार केली असावीत, असे दिसते. काही तुकड्यांवर तांबडी तर काही तुकड्यांवर काळी झिलई केल्याचे दिसते. या खापरांचा काळ इसवी सनाच्या आसपासचा असू शकतो किंवा ती त्यापूर्वीचीही असू शकतात. हत्यारे आणि खापरांचा काळ वेगवेगळा आढळल्यास प्रागैतिहासिक काळापासून ताम्रपाषाणयुगाच्या अखेरपर्यंत या भागात सलग वस्ती होती, असे निष्पन्न होऊ शकते.


‘ते’ दफनकुंभ होते का?
प्रागैतिहासिक काळात मृतदेह कुंभाच्या आत ठेवून वर झाकण बसवून दफन करण्याची प्रथा होती. काही जमातींमध्ये तर मृत्यू पावलेली व्यक्ती परत येऊ नये म्हणून तिचे पाय तोडून कुंभात ठेवले जात असे. माण तालुक्यात सापडलेली काही खापरे आणि मातीच्या भांड्यांची बुडे यांचे माप पाहिले असता ते दफनकुंभ असावेत, अशी शंका आहे. कुंभाचे बूड आणि तोंडाजवळचा तुकडा यावरून अंदाजे आकृती काढली असता, हा कुंभ तोंडाजवळ दोन फूट व्यासाचा, बुडाजवळ सहा इंच व्यासाचा आणि ४४ इंच उंचीचा असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञांनी हे पुरावे पाहिल्यानंतरच नेमकी माहिती मिळू शकेल.


हत्यारे प्रागैतिहासिक काळातीलच
माणमध्ये सापडलेली सूक्ष्माश्मे (गारेच्या दगडाची छोटी हत्यारे) प्रागैतिहासिक काळातील असण्याच्या तर्काला ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागप्रमुख डॉ. अभिजित दांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला आहे. शंखाच्या बांगड्या दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे सातवाहनाच्या काळापर्यंत वापरात होत्या. राज्यात काही ठिकाणी शंखाचा गाभा सापडला आहे. मात्र, सूक्ष्माश्मे प्रागैतिहासिक काळातीलच असून, त्यांचा काळ पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंतचा असू शकतो, असे त्यांनी सांगितले. या हत्यारांमध्ये सूची (सुई), एका बाजूला सुरीसारखी धार असलेल्या कात्रणी, छिद्रे पाडण्याच्या सुया अशा हत्यारांचा समावेश आहे.



प्रागैतिहासिक काळ
कोणता
इतिहासाच्या अभ्यासासाठी जी साधने वापरली जातात, त्यात लिखित साधनांचा समावेश होतो. ही साधने इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून उपलब्ध आहेत. त्यापूर्वीचा काळ ‘प्रागैतिहासिक काळ’ म्हणून ओळखला जातो. माण तालुक्यात सापडलेली गारेची हत्यारे अश्मयुगीन किंवा ताम्रपाषाण युगातीलही असू शकतात.


लाल गार, छोट्या शंखांचे रहस्य
समुद्रात मोठ्या शंखांच्या आत छोटे शंख जाऊन बसतात. ‘नेरुटा रिक्लूझा’ जातीचे असे शंख माणमध्ये सापडले आहेत. याचाच अर्थ मोठे शंख पोकळ केल्यानंतर ते तिथे पडले आहेत. याखेरीज इथं अर्धा लाल आणि अर्धा पांढरा गारेचा दगड (कानेर्लियन) सापडतो. लाल गार असू शकते; मात्र पांढरी गार तापवून ती लाल करता येते आणि ‘गोमेद’ला पर्याय म्हणून वापरता येते, अशा तर्कातून भट्टीत ते दगड गरम केले असावेत, असा कयास आहे. याखेरीज दोरा ओवण्याच्या छिद्रासह जुने मणीही इथे दिसतात. त्यामुळं हे रहस्य आणखी वाढलंय.

Web Title: 'False' met a rich culture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.