खोटारड्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर २० वर्षांनी खटला चालणार!

By admin | Published: June 18, 2015 02:35 AM2015-06-18T02:35:53+5:302015-06-18T02:35:53+5:30

लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका

False police officer will be prosecuted after 20 years! | खोटारड्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर २० वर्षांनी खटला चालणार!

खोटारड्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर २० वर्षांनी खटला चालणार!

Next

मुंबई : लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका खटल्यात खोटी साक्ष दिल्याबद्दल व खोटे पुरावे सादर केल्याबद्दल आता त्यांच्यावर सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला चालणार आहे.
मालवण पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या त्या खून खटल्यात सावंतवाडी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या खून प्रकरणाचा सारिपुत्र यांनी काही काळ तपासी अधिकारी या नात्याने तपास केला होता. त्या नात्याने खटल्यात त्यांना साक्षीसाठी बोलावले होते. मात्र त्या खटल्याच्या सुनावणीत सारिपुत्र यांनी खोटी साक्ष दिली व बनावट पुरावे सादर केले, असा निष्कर्ष सत्र न्यायालयाने नोंदविला व त्याबद्दल भादंवि कलम १९३ व १९४
अन्वये खटला चालविण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली. याविरुद्ध सारिपुत्र यांनी केलेले अपील उच्च न्यायालयात गेली २० वर्षे प्रलंबित होते व ते दाखल करून घेताना स्थगिती दिली गेल्याने सारिपुत्र यांच्यावरील खटला सुरूही होऊ शकला नव्हता. आता न्या. अभय ठिपसे यांनी अंतिम सुनावणीनंतर सारिपुत्र यांचे अपील फेटाळले. त्यामुळे खोटी साक्ष व खोटे पुरावे देण्याबद्दलचा गेली २० वर्षे अडकून पडलेला खटला आता मार्गी लागेल.
न्या. ठिपसे यांनी त्या खटल्यात सारिपुत्र यांनी दिलेली साक्ष पाहिली तेव्हा त्यांना असे आढळले, की त्यांनी खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची स्पष्ट कबुलीच उलट तपासणीत दिली होती. एवढेच नव्हे, तर इतरही खटल्यांमध्ये पोलीस असेच
करतात, अशी बढाईही त्यांनी मारली होती.
यासंदर्भात न्या. ठिपसे यांनी असे नमूद केले, की सारिपुत्र यांनी दिलेली कबुली पाहता त्यांच्यावर खटला चालविण्याचा आदेश देण्यावाचून सत्र न्यायालयापुढे पर्यायही नव्हता. तसा आदेश दिला गेला नसता तर ते औचित्याला सोडून ठरले असते आणि त्याने न्यायसंस्था थट्टेचा विषय ठरून तिची अप्रतिष्ठा झाली असती.

मुळात चूक कोणाची ?
अंतरिम स्थगितीमुळे सारिपुत्र यांच्यावरील खटला २० वर्षे चालू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. पण मुळात खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची सारिपुत्र यांनीच कबुली दिली आहे, ही वस्तुस्थिती २० वर्षांपूर्वीही तशीच होती. त्यामुळे अपील दाखल करून घेताना पब्लिक प्रॉसिक्युटरने ही बाब लक्षात आणून दिली नाही, म्हणून किंवा न्यायाधीशांच्याही ती लक्षात आली नाही म्हणून स्थगिती दिली. सर्व संबंधितांनी ‘ब्रिफ’ नीटपणे वाचले असते तर मुळात स्थगितीही दिली नसती.

चाणाक्ष वकिलाने घेतलेल्या उलट तपासणीत सारिपुत्र गोंधळून गेले व त्यामुळे त्यांनी अशी कबुली दिली, असा त्यांच्या वकिलाने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्या. ठिपसे यांनी म्हटले, की सारिपुत्र यांनी गोंधळून कबुली दिली किंवा कसे हा खटल्यात विचारात घेण्याचा मुद्दा आहे व त्यांना दोषी धरायचे की नाही, हे ठरविताना तो विचारात घेता येईल. पण कबुली दिली होती ही वस्तुस्थिती असल्याने मुळात त्यांच्यावर खटलाही चालवायला नको, असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे.

Web Title: False police officer will be prosecuted after 20 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.