करवसुलीसाठी कचरा फेको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 02:19 AM2017-03-24T02:19:25+5:302017-03-24T02:19:25+5:30

स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, कचरामुक्त ठाणे... अशा वल्गना करणाऱ्या ठाणे महापालिकेने गुरुवारी कचरा टॅक्सवसुलीसाठी...

False trash for tax evasion! | करवसुलीसाठी कचरा फेको!

करवसुलीसाठी कचरा फेको!

Next

ठाणे : स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, कचरामुक्त ठाणे... अशा वल्गना करणाऱ्या ठाणे महापालिकेने गुरुवारी कचरा टॅक्सवसुलीसाठी अचानक नौपाडा आणि कोपरीतील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच मांस-मच्छीचा कचरा आणून टाकला. यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले. पालिकेने हा कचरा उचलण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी तो उचलून नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात टाकला. त्यानंतर, जोपर्यंत आयुक्त या भागात येऊन प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही व्यापाऱ्यांनी घेतला. कायदा हाती घेणारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि घनकचरा विभागाचे अधिकारी बालाजी हळदेकर यांच्याविरोधात व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला. तसेच या कृतीच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्धार केला आहे. यामुळे दुपारनंतर बिथरलेल्या प्रशासनाने हा कचरा उचलण्यास सुरुवात केली.
ठाणे महापालिका सध्या विविध स्वरूपाच्या करांच्या वसुलीसाठी नाना शकला लढवत आहे. त्यात, यंदापासून कचरा टॅक्सही पालिकेने लागू ) केला असून त्याच्या वसुलीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. घनकचरा विभागाला प्रशासनाने कचरा करवसुलीसाठी २० कोटींचे लक्ष्य दिले होते. त्यातील केवळ ५१ लाखांपर्यंतचीच वसुली झाल्याने आयुक्तांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वसुलीचे सक्त आदेश देऊन ही वसुली न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा फतवादेखील काढल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार, या विभागामार्फत गुरुवारी सकाळपासूनच नौपाडा येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा आणून टाकला. त्यामुळे १० वाजता दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना त्रास झाला. त्यांनी प्रशासनाच्या या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे.
दरम्यान, हा कचरा आम्ही टाकलाच नसल्याचा खुलासा पालिकेकडून करण्यात येत होता. परंतु, पालिकेचे कर्मचारी आणि काही अधिकारी कचरा टाकताना कॅमेऱ्यात बंद झाले. याचे पुरावेच व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना सादर केले.
या घटनेची माहिती मिळताच, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि इतर नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी वाघुले आणि त्यांच्या इतर सहकारी नगरसेवकांनी कचरा उचलून इतर ठिकाणी हलवला. परंतु, पालिका आयुक्त येथे येत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडणार नसल्याचा इशारा देऊन दुपारी १ वाजताच्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. विशेष म्हणजे नौपाड्यातच नव्हे, तर कोपरी भागातील अष्टविनायक चौकातील दुकानांच्या समोरदेखील पालिकेने अशा पद्धतीने कचरा टाकल्याने येथील दुकानदारदेखील संतप्त झाले होते.
कायदा हातात घेऊन पालिकेने केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी दुपारनंतर व्यापाऱ्यांनी पालिका मुख्यालयाकडे धाव घेऊन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत पालिका आयुक्तांनी त्यांना भेट दिली नाही.
पालिकेने अतिशय चुकीच्या पद्धतीने ही वसुली सुरू केली आहे. पालिकेच्या या कृतीचा निषेध करून आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत दुकाने बंद ठेवत आहोत. असे दुकानदार मितेश शहा यांनी सांगितले. तर नगरसेवक संजय वाघुले म्हणाले की, वसुलीसाठी इतर अनेक पर्याय होते. परंतु, हा पर्याय चुकीचा आहे. ठाणे महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही या कृतीचा निषेध केला आहे. तर व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पालिकेने अशा पद्धतीने कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: False trash for tax evasion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.