पहाटे ४ वाजता आवळणार फास
By admin | Published: July 20, 2015 12:57 AM2015-07-20T00:57:26+5:302015-07-20T00:57:26+5:30
मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी
नागपूर : मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरावरून जोरदार तयारी झाली आहे. ३० जुलै रोजी त्याला फाशी देण्यात येणार असून त्या दिवशीचा एकूणच घटनाक्रम निश्चित करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजता याकूबच्या गळ्यातील फास आवळण्यात येणार आहे.
कारागृहाच्या सूत्रानुसार, याकूब एका आजाराने ग्रस्त आहे. मात्र, तो कधीच चिडचिड करीत नाही. मात्र, फाशीच्या तयारीचे संकेत मिळाल्यापासून त्याची अस्वस्थता तीव्र झाली आहे. याकूबने आपल्या दिनचर्येत मात्र विशेष बदल केलेला नाही. तो भल्या सकाळी उठतो. नमाज अदा करतो. कुराण आणि चांगली काही पुस्तके त्याने मागून घेतली आहे. त्या आधारे तो फाशी यार्डात दिवस काढतो आहे. फाशीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कारागृह प्रशासनाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वकील, डॉक्टर, एक प्रतिष्ठित व्यक्ती (पंच म्हणून) असे मोजकेच उपस्थित असतील. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाईल. कारागृहाबाहेर आणि परिसरातही कडक पोलीस बंदोबस्त असेल.
असा असेल घटनाक्रम (अंदाजित)
पहाटे ३ वाजता : झोपेतून उठविणार
३.१० वाजता : आंघोळ
३.१५ वाजता : पूजा-प्रार्थना
३.२० वाजता : मनपसंत नाश्ता देणार
३.२५ वाजता : मन:शांतीसाठी धार्मिक पुस्तकाचे वाचन
३.३५ वाजता : वधस्तंभाकडे नेणार
३.४० वाजता : केलेल्या गुन्ह्णाचा पश्चाताप करण्याची सूचना
३.४५ वाजता : वधस्तंभावर उभे करणार
३.५० वाजता : कशाबद्दल शिक्षा देत आहे, त्याची माहिती सांगणार
४.०० वाजता : मृत्युदंड देणार
४.१० वाजता : डॉक्टर तपासणी करणार लगेच गृहमंत्रालयाला माहिती
देण्यात येईल.
४.१५ वाजता : नातेवाईकांना फोनवरून कळविले जाईल.