मेलेल्या मढ्याची प्रसिद्धी - उद्धव ठाकरेंचे तहलकावर टीकास्त्र
By admin | Published: August 18, 2015 09:06 AM2015-08-18T09:06:25+5:302015-08-18T09:14:06+5:30
एका टिनपाट व बदनाम साप्ताहिकाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल छापलेला आक्षेपार्ह मजकूर म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी 'तहलका'वर टीकास्त्र सोडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - एका टिनपाट आणि बदनाम साप्ताहिकाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल छापलेला आक्षेपार्ह मजकूर म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'तहलका' साप्ताहिकावर टीकास्त्र सोडले आहे. अशा विकृतांना प्रसिद्धीचा आनंद मिळू देऊ नका असे सांगत शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले असले तरी लोकांचा संताप ज्वालामुखीसारखा उसळला तर ते तहलकाच्या मढ्यास भरबाजारात तुडवतील, असा इशाराही त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
शिवसैनिकांना दैवतासमान असलेले शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख चक्क ‘दहशतवादी’ असा करून ‘तहलका’ या मासिकाने नव्या वादाला तोंड फोडले असून त्यामुळे वातावरण तापलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी शांत राहण्यास सांगत जुनं मढ उकरून न काढण्याचा सल्ला देतानाच तहलकावर मात्र जोरदार टीका केली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- साप्ताहिकाने शिवसेनाप्रमुखांना ‘दहशतवादी’ वगैरे ठरवून स्वत:च्या प्रसिद्धीचा कंडू शमविण्याचा प्रयत्न केला आहे ते साप्ताहिक लैंगिक शोषण, विनयभंग, बलात्कार अशा प्रकारांमुळे बदनाम झाले आहे व लोकांनी जोडे मारल्यामुळे अर्धमेल्या अवस्थेत पडले आहे. म्हणजे या साप्ताहिकाचे मढे लोकांनी साफ गाडून त्यावर माती टाकली आहे. तरीही हे मढे स्वत:च वर येऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करीत होते. स्वत:च घाण करायची व चिवडत बसायचे असे प्रकार हे टिनपाट लोक अधूनमधून करीत असतात. शिवसेनाप्रमुखांवर वेडेवाकडे लिहिले की, महाराष्ट्रासह देशात संतापाची लाट उसळेल. शिवसैनिकांची माथी भडकतील व ते रस्त्यांवर उतरून गोंधळ घालतील. त्या साप्ताहिकांच्या कार्यालयावर हल्ला करतील. मग आपोआपच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ‘हीरो’ ठरू, असे स्वप्नरंजन ही मंडळी करीत असतात व तोच त्यांचा पोटापाण्याचा धंदा असतो. पण हा विकृत आनंद या टिनपाटांना लाभू नये व काही काळ शांत राहून अशा पोटावळ्यांना अनुल्लेखाने मारावे, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगून ठेवले आहे. यांची थोबाडे थुंकण्याच्या लायकीचीही नसल्याने त्यांचा साफ भ्रमनिरास झाला आहे.
- शिवसेनाप्रमुखांवर लोकांची कमालीची श्रद्धा आहे. त्यांच्या देशभक्तीवर गर्व आहे. हिंदू समाजाची एक दहशत शिवसेनाप्रमुखांनी नक्कीच निर्माण केली. या देशातला हिंदू स्वाभिमानाने जगला पाहिजे व हिंदूंचा आवाज येथे सिंहगर्जनेसारखा घुमला पाहिजे. पाकड्या धर्मांधांच्या दहशतीला उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनीही कडवट धर्माभिमानी व्हावे. हिंदूने मर्दासारखे जगावे, असे बोलणे व हिंदूंना देशासाठी लढण्यास सज्ज करणे यास कुणी दहशतवाद म्हणत असेल तर त्यांच्या डोक्यात हिरवे किडे वळवळत आहेत असेच म्हणावे लागेल. अतिरेक्यांना पकडून चौकशा चालू न ठेवता त्यांना गोळ्या घालायला हव्यात. लोकशाहीमधील मानवतावादाने हा प्रश्न सुटणार नाही. या देशामध्ये पुन्हा धिंग्रा, चापेकरबंधू उभे राहिले पाहिजेत. अशा तरुणांनी राष्ट्रद्रोही अतिरेक्यांना जेथे मिळतील तेथे ठेचून ठार मारले पाहिजे आणि अशा राष्ट्रप्रेमी तरुणांना वाचविण्याचे काम हिंदुस्थान सरकारने करायला हवे, अशी ज्वलंत भूमिका घेऊन शिवसेनाप्रमुखांनी पाकड्या दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण केली.
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशातून मुळापासून उखडला जाईल, अशी तोफ डागणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच. अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ माझ्याशी आहे, असे आव्हान दहशतवाद्यांना देऊन हिंदू यात्रेकरूंची सुरक्षा पाहणारे बाळासाहेब हे
महान योद्धे होते.
- शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्राभिमानी दहशत-दरार्यानेच हिंदू ‘मर्द’ बनला, त्यामुळे अशा शिवसेनाप्रमुखांना कोणी दहशतवादी म्हणत असेल तर त्या दहशतवादाचा समस्त हिंदूंना अभिमान आहे व तसे प्रत्येकाने छातीठोकपणे सांगायला हवे. शिवसेनाप्रमुखांसारख्या तेजस्वी सूर्यावर थुंकणार्या विकृतांना प्रसिद्धीचा आनंद मिळू देऊ नये या मताचे आम्ही असलो तरी लोकांचा संताप ज्वालामुखीसारखा उसळला तर ते तहलकाच्या मढ्यास भरबाजारात तुडवतील. महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, पण उकरून काढलेल्या मढ्यांवर तलवार चालवून ‘धैर्यधर’ म्हणून मिरवण्याची हौसदेखील महाराष्ट्राला नाही. बाहेर वादळ उठलेले असताना शांत राहायचे व सर्व शांत झाल्यावर वादळ निर्माण करायचे हा मंत्र आम्हाला शिवसेनाप्रमुखांनीच दिला आहे. मढेसुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे, हे शिवसेनाप्रमुखांचे मोठेपण आहे.