पैशाच्या वसुलीसाठी कुटुंबीयांना मारहाण

By admin | Published: May 21, 2016 01:06 AM2016-05-21T01:06:16+5:302016-05-21T01:06:16+5:30

जाधववाडी येथे घरात घुसून महिलेसह तिच्या पती व मुलाला एकाने लाकूड, दगडाने बेदम मारहाण केली.

The families beat the family for the recovery of money | पैशाच्या वसुलीसाठी कुटुंबीयांना मारहाण

पैशाच्या वसुलीसाठी कुटुंबीयांना मारहाण

Next


इंदापूर : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी गुरुवारी (दि.१९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सरडेवाडी (ता. इंदापूर) नजीकच्या जाधववाडी येथे घरात घुसून महिलेसह तिच्या पती व मुलाला एकाने लाकूड, दगडाने बेदम मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपीला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
परशुराम शंकर जमदाडे (रा.जमदाडेवस्ती, सरडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. जमरुद हैदर शेख (वय ४०,रा. जाधववस्ती, सरडेवाडी) या महिलेने त्याविरुध्द तक्रार दिली आहे. हे सावकारीचे प्रकरण असताना देखील पोलिसांनी नोंदीमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही.
सविस्तर हकीकत अशी की, जमरुद शेखचा नवरा हैदर दगडू शेख याने दोन वर्षांपूर्वी आरोपीकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. आपली शहा पाटीजवळची आठ गुंठे जमीन विकून आलेल्या पैशातून व वेळोवेळी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आत्तापर्यंत त्याने आरोपीस पाच ते सहा लाख रुपये दिलेले आहेत. तरीही अजून तेरा हजार रुपये द्यावेत म्हणून आरोपी शेख कुटुंबीयांना घरी जाऊन धमकावत होता. गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच मागणीसाठी तो घरी गेला. त्यांनी आम्ही आत्ताच लग्न समारंभावरुन घरी आलो आहोत. उद्या सकाळी पैसे देतो असे शेख यांनी सांगितले. त्यावरुन शाब्दिक वादावादी झाली. आरोपीने फिर्यादी, तिचा नवरा व मुलगा भैया यांना दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांना मी भीत नाही. काय करायचे ते करा. पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन तो निघून गेला.
या प्रकारानंतर सकाळी शेख कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. फिर्यादीला उपचारासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले की, तपासानंतर आरोपी सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले तर तसा गुन्हा दाखल करण्यात येईल.(वार्ताहर)

Web Title: The families beat the family for the recovery of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.