कुटुंबातील मारहाणीमुळे मुले बनतात हिंंसक
By admin | Published: July 3, 2017 08:47 AM2017-07-03T08:47:51+5:302017-07-03T08:47:51+5:30
शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात.
संजय पाठक/ आॅनलाइन लोकमत
नाशिक : शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात... आपण मुलांना शिस्त लावत असतो, असे पालकांचे मत असते आणि ते समाजमान्यही असते. परंतु अशाप्रकारची मारहाणही मुलांवर प्रतिकूल परिणाम करणारी ठरत असून, त्यामुळे मुले हिंसक होतात, असा निष्कर्ष एका पाहणीत निघाला आहे.
बालहक्क आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या युनीसेफच्या नाईन इज माईन तसेच मुंबईतील चरखा या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, यवतमाळ, नंदुरबार, जालना, लातूर अशा सात जिल्ह्यांत नुकताच एक सर्व्हे करून मुलांवरील अत्याचार तसेच त्याचा त्यांच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधन करण्यात आले.
सात जिल्ह्यांत १३ ते १७ वयोगटातील सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थांनी तयार केला असून, चरखा संस्थेच्या अंजली गाडगीळ यांनी याबाबत माहिती दिली. मुलांना घरात आई-वडील किंवा अन्य मोठ्या व्यक्तींनी मारणे, त्याचप्रमाणे शाळेत शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मारणे यांसह रोजगाराच्या ठिकाणी होणारी मारहाण, हिंंसा, दुर्लक्षित करून केला जाणारा मानसिक छळ तसेच रोजगाराच्या ठिकाणी होणारे आर्थिक शोषण याबाबत संशोधन करण्यात आले.
मुले ऐकत नाही किंवा त्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली पालकांकडून मारहाण केली जाते. त्यातून मुले हिंसक आणि गुन्हेगारीकडे वळतात, असे मुलांच्या चर्चेतून निष्पन्न झाले. या सर्वेक्षणात २५ टक्के मुलांना आई मारहाण करते. २१ टक्के मुलांना वडील मारहाण करतात, असे आढळले आहे. १७ टक्के मुलांना दुसऱ्या मुलांकडून मारहाण झाल्याचे आढळले आहे. २५ टक्के मुलांना चापटीने मारहाण झाली. ६ टक्के मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण होते. तर २ टक्के चटके दिले जातात.
मुले शाळेत जाणे टाळतात...
शाळांमध्येदेखील मुलांना मारहाण होते. यातील ५९ टक्के मुलांना शारीरिक तसेच मानसिक शोषणाची भीती असते. ५२ टक्के मुलींना दुर्लक्ष करून उपेक्षित ठेवले जाते. ६४ टक्के मुलांना शिक्षणासाठी नाउमेद केले जाते. तर ५२ टक्के मुलांची अन्य मुलांशी तुलना केली जाते. अशा अनेक प्रकारांमुळे मुले शाळेत जाणेच टाळतात. शाळेत शौचालय नाही म्हणून शाळेत जाण्याची मानसिकता नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
लैंगिक अत्याचाराचे बळी
कुटुंबात केवळ मारहाणच नव्हे तर लैंगिक अत्याचार होतात. दहा टक्के लैंगिक अत्याचार वडिलांकडून तर ६ टक्के अत्याचार आईकडून होत आहे. याशिवाय कुटुंबातील भाऊ, बहीण, आजी-आजोबा, काका अशा व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याचे आढळले आहे.
मुलांना शिस्तीसाठी मारणे किंवा अन्य अत्याचार केले जातात. त्याकडे माध्यमांपासून सर्वच दुर्लक्ष करतात. केवळ मुलींवर बलात्कार झाला तर तेवढीच दखल माध्यमे घेतात. परंतु कुटुंबातील मारहाण मुलांवर किती परिणामकारक ठरू शकते, हे सर्वेक्षणातून दिसून आले.
- अंजली गाडगीळ, चरखा