एसटीतील केवळ आठ कोरोनाबळींच्या कुटुंबीयांना मिळाली 50 लाखांची मदत, राज्यात १०७ कोरोनाबळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:38+5:302021-03-29T04:16:34+5:30
ST News : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
- दयानंद पाईकराव
नागपूर : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु, १४ दिवस सलग ड्यूटी झालेली असावी, या क्लिष्ट नियमामुळे केवळ ८ कुटुंबांनाच ५० लाखाची मदत मिळाली असून, ९९ कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. (The families of only eight Coronabalis in ST received assistance of Rs 50 lakh, 107 Coronabalis in the state)
लॉकडाऊनच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. अनलॉकनंतरही आता दुसऱ्या टप्प्यात कोरोना झपाट्याने पसरत चालला असतानाही ते प्रवाशांना सेवा देत आहेत.
प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यात चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, सुरक्षा रक्षक अशा प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात एक लाख एसटी कर्मचारी आहेत. २३ मार्च २०२० ते २७ मार्च २०२१ दरम्यान महाराष्ट्रात ४,५०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर विमा कवचाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सलग १४ दिवस ड्युटी केलेली असावी, असा क्लिष्ट नियम एसटी महामंडळाने घातलेला आहे. त्यामुळे १०७ पैकी केवळ ८ कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबीयांना ५० लाखाचे विमा कवच मिळू शकले. उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना विमा कवचाचा लाभ झाला नाही. त्यामुळे महामंडळाने हा नियम शिथिल करून उर्वरित कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ देण्याची मागणी होत आहे.
एका दिवसातही होते कोरोनाची लागण
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १४ दिवस सलग ड्युटी केलेली असावी, हा एसटी महामंडळाचा नियमच अन्यायकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक फेऱ्या रद्द असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना १४ दिवस सलग ड्युटी मिळू शकली नाही. एसटीचा एक कर्मचारी दिवसभरात ४०० ते ५०० प्रवाशांच्या संपर्कात येतो. कोरोना हा एका दिवसातही होऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने हा नियम शिथिल करण्याची गरज आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा दिली. आजही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ते प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने नियमात शिथिलता आणून उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाखाच्या विमा कवचाचा लाभ द्यावा. -अजय हट्टेवार,
प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना