घरावर वृक्ष कोसळल्यामुळे कुटुंब बेघर

By admin | Published: August 4, 2016 02:08 AM2016-08-04T02:08:47+5:302016-08-04T02:08:47+5:30

मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे.

Family displaced due to tree collapse at home | घरावर वृक्ष कोसळल्यामुळे कुटुंब बेघर

घरावर वृक्ष कोसळल्यामुळे कुटुंब बेघर

Next


नवी मुंबई : मुसळधार पावसामध्ये घरावर झाड कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. या घटनेमध्ये वृध्द विधवा महिलेचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे ते तोडण्याची प्रशासनाकडे मागणी करूनही दखल न घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्या कुटुंबीयांनी केला आहे.
मागील तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असून, अनेक विभागांमध्ये सोसाट्याचा वाराही वाहत आहे. रविवारी दुपारी अशाच मुसळधार पावसात घणसोली गावातील म्हशेश्वरनगरमधील एक झाड कोसळले. परंतु हे झाड लगतच्या काळुबाई पाटील यांच्या घरावर कोसळले. त्यांचे पती पांडुरंग व मोठा मुलगा मनोज यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात काळुबाई, लहान मुलगा ज्ञानेश्वर याच्यासोबत मासेमारी करून कसाबसा संसाराचा गाडा हाकत आहेत. त्याठिकाणी काळुबाई यांच्यासह त्यांचा मुलगा, दोन सुना व त्यांची लहान मुले यांचे वास्तव्य होते. परंतु निसर्गाने त्यांचा निवारा देखील हिसकावून घेतला आहे. मात्र या संपूर्ण घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे.
त्यांच्या घरालगतचे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यापासून घराला धोका असल्याची कल्पना त्यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार हे झाड कापण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या विनंतीची कोणीच दखल घेतली नाही. अखेर रविवारी ते झाड त्यांच्या घरावर कोसळले. यामध्ये काळुबाई यांचे जुने घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने पावसाचा जोर जास्त वाढल्यामुळे भीतीपोटी घटनेच्या काही वेळ अगोदरच सर्व जण शेजाऱ्यांकडे गेले होते. त्यामुळे या घटनेत अगदी थोडक्यात जीवितहानी टळली असली, तरीही संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे. माणुसकीच्या भावनेतून त्याच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत यशवंत पाटील यांनी त्या कुटुंबाला तात्पुरता आधार दिलेला आहे. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाच्या तूर्तास राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी करून दिलेली आहे. परंतु त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याला प्रशासन जबाबदार असल्यामुळे प्रशासनाकडूनच त्यांचे पुनर्वसन देखील होण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Family displaced due to tree collapse at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.