दुष्काळाने घेतला कुटुंबाचा जीव!

By admin | Published: May 13, 2016 05:02 AM2016-05-13T05:02:03+5:302016-05-13T05:02:03+5:30

दुष्काळदाह आणि आग ओकणाऱ्या उन्हाच्या काहिलीत होरपळून निघालेल्या विदर्भातील एका आदिवासी शेतकरी कुटुंबाने नापिकी आणि डोईवरील कर्जाला कंटाळून सामूहिक विषप्राशन केल्याची हृदयद्रावक घटना घडली

Family life taken from drought! | दुष्काळाने घेतला कुटुंबाचा जीव!

दुष्काळाने घेतला कुटुंबाचा जीव!

Next

संग्रामपूर (बुलडाणा) : दुष्काळदाह आणि आग ओकणाऱ्या उन्हाच्या काहिलीत होरपळून निघालेल्या विदर्भातील एका आदिवासी शेतकरी कुटुंबाने नापिकी आणि डोईवरील कर्जाला कंटाळून सामूहिक विषप्राशन केल्याची हृदयद्रावक घटना घडली. संग्रामपूर तालुक्यातील मालठाणा येथे बुधवारी घडलेल्या या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
संग्रामपूर तालुक्यातील जेमतेम ५० कुटुंबसंख्या असलेल्या मालठाणा हे गाव संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांच्या सीमेवर असून, गावात आदिवासी पावरा समाजाचे लोक राहतात. या समाजातील नानसिंग सित्तु मसाने या वृद्धाचे कुटुंब राहत असून, नियतीने काही वर्षांपूर्वी त्यांची दोन मुले हिरावून घेतली. त्यानंतर दोन विवाहित मुले, दोन सुना, नातवंडं असा परिवार वडिलोपार्जित चार एकर शेतीवर अवलंबून होता. शेतीमध्ये काबाडकष्ट करून उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला; मात्र निसर्गाने अन् नशिबानेही त्यांना साथ दिली नाही. गेल्या हंगामात दोन एकरात पेरलेला मका पिकला नाही. उर्वरित दोन एकरात कांदा लागवड केली होती. या दोन्ही पिकांतून लागवड खर्चसुद्धा निघाला नाही. दुसरीकडे कुटुंबावर बँक आणि सावकाराच्या कर्जाचा डोंगर कायम होता. या परिस्थितीसमोर हतबल झालेल्या या कुटुंबाने आत्महत्येचा मार्ग अवलंबला.
११ मे रोजी रात्री नानसिंग मसाने, सून लक्ष्मी भावसिंग मसाने, नातू सुरेश भावसिंग मसाने आणि मुलगा दिनेश नानसिंग मसाने या चौघांनीही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही बाब दुसऱ्या खोलीत झोपलेल्या नानसिंग यांच्या ७० वर्षीय पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी गावात चारचाकी वाहनाची व्यवस्था नसल्याने चौघांना दुचाकींनी जळगाव जामोद येथील रुग्णालयात हलविले. दिनेश नानसिंग मसाने याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नानसिंग सित्तु मसाने, लक्ष्मी भावसिंग मसाने आणि सुरेश भावसिंग मसाने यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार खामगाव येथील रुग्णालयात तातडीने हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र नियतीला हे मान्य नव्हते. खामगाव येथे लक्ष्मी भावसिंग मसाने आणि सुरेश भावसिंग मसाने या माय-लेकाचा मृत्यू झाला. नानसिंग मसाने यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, नानसिंगे यांची प्रकृती चिंताजनक असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)
>> निरागस डोळ्यांत अश्रूंचा पाझरशेतात काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबासाठी बुधवारची रात्र ही काळरात्र ठरली. घरातील विधवा सून, मुलगा तसेच नातवाने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविले. वृद्ध नानसिंग मृत्यूशी झुंज देत आहेत. चार कर्त्या माणसांनी मृत्यूला जवळ केल्याने या आदिवासी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एकाच वेळी कुटुंबातील तीन सदस्य नियतीने हिरावल्यामुळे घरातील निरागस चिमुकल्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येत होते.
> चार लाखांचे कर्ज
या आदिवासी शेतकरी कुटुंबाकडे पाच एकर शेती असून, या शेतीवर महाराष्ट्र बँकेचे अडीच लाख रुपयांचे, तर खासगी सावकारांचे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मृताच्या नातेवाइकांनी दिली. एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
>तिघांवर अंत्यसंस्कार
आदिवासी कुटुंबातील तीन सदस्यांच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. जळगाव जामोद येथे मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. मालठाणा येथे गुरुवारी शोकाकुल वातावरणात दिनेश नानसिंग मसाने, लक्ष्मी भावसिंग मसाने, सुरेश भावसिंग मसाने या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Family life taken from drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.