कुटुंब रंगलंय ड्रग्जच्या विक्रीत...

By Admin | Published: May 29, 2017 03:38 AM2017-05-29T03:38:41+5:302017-05-29T03:38:41+5:30

चैनीचे जीवन जगण्यासाठी आईसह दोन मुले आणि दोन सुनांनी घरातूनच ड्रग्जचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती दिंडोशी पोलिसांनी

Family painted in sales of Drugs ... | कुटुंब रंगलंय ड्रग्जच्या विक्रीत...

कुटुंब रंगलंय ड्रग्जच्या विक्रीत...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चैनीचे जीवन जगण्यासाठी आईसह दोन मुले आणि दोन सुनांनी घरातूनच ड्रग्जचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती दिंडोशी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आली आहे. या प्रकरणात आईसह मुलगा आणि दोन सुनांना दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणखीन एक मुलगा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
गीता श्याम परमार (४७), रमेश श्याम परमार (२७), शालू रमेश परमार (१९) आणि मारता अजय परमार (२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अजय परमार हा फरार आहे.
गोरेगावातील बीएमसी कॉलनीत एकमजली घरात परमार कुटुंबीय राहतात. पती श्याम परमार याच्या निधनानंतर गीतावर मुलाची जबाबदारी आली. श्याम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला रमेश आणि अजय हे चोरी करून आणत असलेल्या पैशांवर त्यांचा घरखर्च भागे. त्यानंतर गीता हिने चैनीचे जीवन जगण्यासाठी घरातून ड्रग्जचा धंदा सुरू केला. यामध्ये मुलांच्या लग्नानंतर तिने सुनांची मदत घेतली.
मुले बाहेर चोऱ्या करायचे तर सुना आईसह ड्रग्जचा पुरवठा करत असे. घराजवळच फिल्मसिटी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रगलर, पडद्यामागील कलाकारांना त्यांनी हेरले. तसेच जवळीलच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळपास २ ते ३ हजार तरुण-तरुणी काम करतात. यातीलही काही जण तिचे ग्राहक बनले होते. त्यांनाही या ड्रग्जचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. हळूहळू ग्राहक वाढले. त्यामुळे परमार कुटुंबीयांचा धंदाही तेजीत सुरू झाला. गुप्तपणे सुरू असलेल्या या धंद्याबाबत स्थानिकांना संशय येत नसे. सासूसह दोन्ही सुना दिसायला साध्या असल्या तरी या कामात मात्र भलत्याच चलाख होत्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला. मात्र पोलीस आल्याचे पाहून सासू-सुनांनी स्वत:च स्वत:चे कपडे फाडून घेतले होते आणि पोलिसांनी विनयभंग केल्याचा कांगावा केला होता. अशात आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा करायच्या आणि त्या गोंधळात ड्रग्ज घेऊन पळ काढायचा, हा त्यांचा ‘फॉर्म्युला’ होता.
अशातच नुकतेच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या परमार कुटुंबीयांना धडा शिकविला. या वेळी अचानक आलेल्या पोलिसांमुळे सासू-सुना हडबडल्या. समोर महिला स्टाफ पाहून त्यांची तारांबळ उडाली. या वेळी त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे ६० गॅ्रम एमडी, ८ कोरेक्स बॉटल्स, ३५ फेनेरेक्स बॉटल्स, १३५ ग्रम चरस, ३९ गॅ्रम गांजा, ७९९ बटण असा एकूण १ लाख ५६ हजार हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गीतासह मुलगा रमेश, सून शालू आणि मारता यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. तसेच पसार अजयचा शोध सुरू आहे. दोन्हीही मुलांवर मारामारी, चोरीचे सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

असे ठरायचे भाव...

१ गॅ्रम एमडी आणि चरससाठी ते बाराशे ते दोन हजार रुपये घेत होते. तर एका बटणमागे त्यांना बाराशे रुपये मिळत होते. फिल्मसिटीमधील स्ट्रगलर, कॉर्पोरेट सेक्टरमधील तरुण, तरुणी त्यांचे ग्राहक होते. या पैशांतून त्यांनी घरात महागड्या वस्तू, दागिने खरेदी केले होते.
 
तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस निरीक्षक रवी अडाणे, एपीआय घनश्याम नायर, अविनाश जाधव, देसाई, पीएसआय पाटणे, पोलीस हवालदार मंदार जाधव महिला पोलीस शिपाई आनिता सुतार, सुवर्णा शिंदे या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Family painted in sales of Drugs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.