मध्यस्थांच्या मदतीने सोडवा कौटुंबिक वाद
By admin | Published: June 12, 2016 04:26 AM2016-06-12T04:26:21+5:302016-06-12T04:26:21+5:30
सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झाल्यानंतर अखेरीस टेनिसपटू लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई त्यांच्यामधील वाद सामंजस्याने सोडविण्यास तयार झाले आहेत.
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झाल्यानंतर अखेरीस टेनिसपटू लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई त्यांच्यामधील वाद सामंजस्याने सोडविण्यास तयार झाले आहेत. उच्च न्यायालयाने या दोघांनाही त्यांच्यातील वाद तज्ज्ञ मध्यस्थाच्या साहाय्याने सोडवण्याची सूचना केली.
पती-पत्नीमधील दीर्घकालीन वादामुळे १० वर्षांच्या मुलीवर होणाऱ्या मानसिक परिणामाची जाणीव करून दिल्यावर लिएंडर व रेहा मध्यस्थाद्वारे वाद सोडवण्यास तयार झाले. रेहाने लिएंडरविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस केली आहे. या केसवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. लिएंडरने मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या अर्जानंतर रेहाने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत केस केली. तसेच दरमहा देखभालीचा खर्च म्हणून चार लाख रुपयांची मागणी केली. त्याशिवाय
राहत्या घरातून काढण्यात येऊ
नये, अशीही मागणी रेहाने केली आहे.
‘रेहाने लिएंडरवर मानसिक, शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र तिने दावा केल्याप्रमाणे तिच्यावर कोणताही अत्याचार करण्यात आला नाही,’ असा युक्तिवाद लिएंडरच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी केला. आम्ही ‘लिव्ह-इन-रिलेशन’मध्ये होतो. मी तिला कधीच फ्लॅटमधून बाहेर जाण्यास सांगितले नाही. यापूर्वीही आम्ही हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या (रेहा) मागण्या वाढतच आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नाही, असे लिएंडरच्या वतीने पौडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅलिम्पिक स्पर्धा तोंडावर
आॅलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली आहे आणि त्यापूर्वी मला हा वाद सोडवायचा आहे, असा युक्तिवाद लिएंडरच्या वतीने अॅड. पौडा
यांनी केला. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मध्यस्थाऐवजी खुद्द न्यायाधीशांनीच या दोघांशी चेंबरमध्ये बोलून वाद सोडवावा, अशी विनंती न्या. रेवती मोहिते - डेरे यांना केली. या दोघांशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीशांनी या दोघांना २० जून रोजी चेंबरमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले.