कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या
By admin | Published: February 27, 2017 05:33 AM2017-02-27T05:33:12+5:302017-02-27T05:33:12+5:30
इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना, रविवारी दुपारी बॉम्बे रुग्णालयाजवळील रामलाल मेन्शनमध्ये घडली.
मुंबई : एका चार्टड अकाउंटंटच्या (सीए) पत्नीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना, रविवारी दुपारी बॉम्बे रुग्णालयाजवळील रामलाल मेन्शनमध्ये घडली. रूपा विकास शहा (वय ४४) असे त्यांचे नाव असून, या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
व्यवसायाने सीए असलेले विकास शहा व त्यांचे बंधू मेट्रो सिनेमागृहाच्या मागील रामलाल मेन्शनमध्ये पाचव्या मजल्यावर दोन स्वतंत्र टेरेस फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. शहा बंधू कामानिमित्त बाहेर असताना, दुपारी साडेबाराच्या सुमारास रूपा शहा यांनी त्यांच्या दीराच्या फ्लॅटच्या टेरेसवरून उडी मारली. त्या वेळी त्यांचा १३ वर्षांचा मुलगा हा आतल्या खोलीत अभ्यास करत होता, तर पुतण्या जेवण करत होता. दिराची मोलकरीण कपडे धूत होती. तिने आवाजामुळे बाहेर येत पाहिले असता, रूपा शहा या पडल्याचे लक्षात आले. इमारतीच्या वॉचमनच्या मदतीने तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर, रूपा यांना जीटीमध्ये नेण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, शहा यांच्या घरी ‘सुसाइड नोट’ अथवा अन्य कोणतीही बाब आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या टेरेसला लोखंडी ग्रील असल्याने, त्यांनी दिराच्या टेरेसवरून उडी मारली असावी, असे आझाद मैदान पोलिसांनी सांगितले. घरगुुती वादातून रूपा शहा यांनी हे कृत्य केले असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात आली. (प्रतिनिधी)