पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना; जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने कुटुंबाला टाकलं वाळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:33 PM2021-09-01T23:33:54+5:302021-09-01T23:34:25+5:30
१४ आरोपींवर गुन्हा, फिर्यादीने त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेताना तो जातपंचायतीकडून घेतला नाही याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.
पिंपरी : पत्नीशी घटस्फोट घेताना तो जातपंचायतीकडून घेतला नाही, याच्या रागातून एका कुटुंबाला समाजातून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १४ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना २६ मार्च २०१८ ते १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत वाकड व महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला.
करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन शामराव उगाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रामदास भोरे, अगर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भोरे, गोविंद वाघमारे (सध्याचा पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १) फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे जातपंचायत चालवितात. यातील आरोपी अप्पा वाघमारे, बाजीराव वाघमारे, साहेबराव वाघमारे, बाळकृष्ण वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील आहेत. तर इतर आरोपी पंच आहेत. फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद आहे. त्यातून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात चालू आहे. फिर्यादीने त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेताना तो जातपंचायतीकडून घेतला नाही याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.
फिर्यादीने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यावरून चौकशी करून पोलिसांनी बुधवारी (दि. १) याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.