Kashiram Chinchay: 'पारू गो पारू, वेसावची पारू'चा पिता हरपला; शाहीर काशीराम चिंचय यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:48 AM2022-01-14T11:48:33+5:302022-01-14T11:54:40+5:30
Kashiram Chinchay Death: गेले काही दिवस आजारी होते. उपचारासाठी त्यांना सुरुवातीलाअंधेरी पश्चिम येथे ब्रह्मकुमारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- कोळी गीते सात समुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी नाच गाण्यांचा बादशाह काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. आज दुपारी १ वाजता त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
गेले काही दिवस आजारी होते. उपचारासाठी त्यांना सुरुवातीलाअंधेरी पश्चिम येथे ब्रह्मकुमारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पाच दशके कोळी, आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले .
काशिराम चिंचय यांनी वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे निर्मित केलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या अमिताभ बच्चन आणि काशीराम यांच्या आवाजातील संवाद आजही कोळ्यांची संस्कृती ताजी करतो. वेसावची पारू या कोळी गीतांच्या पारंपारिक गीतांना प्लॅटिनम डिस्कने सन्मानित केले होते. अखेर पारू गो पारू वेसावची पारू आणि कोणताही शासकीय पुरस्कार न घेताच अशा अजरामर गीतांना उजाळा देणारा पालक कोळ्यांच्या पारुला पोरका करून गेला, अशी प्रतिक्रिया कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी व्यक्त केली.