प्रसिद्ध कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा आज जन्मदिवस
By Admin | Published: July 6, 2017 01:15 PM2017-07-06T13:15:00+5:302017-07-06T13:46:07+5:30
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार. जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही.
style="text-align: justify;">- प्रफुल्ल गायकवाड
(जुलै ६, १९२७ - ऑगस्ट २८, २००१)
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार. जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी तेथे उमटविला. आरंभी काही काळ पत्रकारी केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळाचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रूढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत; तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही, तर बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी व डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी–द व्हिलेज हॅड नो वॉल्स – डॅनिश – Landsbyen). वावटळ, करुणाष्टक आणि कोवळे दिवस ह्या त्यांच्या कादंबऱ्या आत्मचरित्रपर आहेत. गांधीवधानंतर झालेल्या भीषण दंगली, लुटालूट आणि जाळपोळ ह्यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताचीवावळट ही कहाणी होय. विंड्स ऑफ फायर ह्या नावाने तिचे इंग्रजी भाषांतर झाले आहे. करुणाष्टकात दारिद्रयाने ग्रासलेली आठ मुलांची दुःखी आई त्यांनी उभी केली. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले होते. कोवळे दिवस ह्या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्याची चीड आणि पुढंच पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग चोखाळण्याची दलित मनाची धडपड दाखविली आहे. सत्तांतरमध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घूसखोरी, त्यांचे संघर्ष; नरानरांतले, माद्यामाद्यांतले सर्व वानरांची जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत आहे. सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानरांच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्तिप्रवृत्तींचीही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. ‘काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो... जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरूक परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो ..... संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो’ ही कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत.
त्यांनी नाटकेही लिहिली : तू वेडा कुंभार, सती, पति गेले गं काठेवाडी ही त्यांतील काही विशेष उल्लेखनीय होत. कुनाचा कुनाला मेळ न्हाई आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (कथा–१९५०), वंशाचा दिवा (कथा–१९५०), जशास तसे (कथा–१९५१), सांगत्ये ऐका (पटकथा, संवाद–१९५९), रंगपंचमी (पटकथा, संवाद–१९६१) ह्यांचा समावेश होतो.
नागझिरा"(१९७९), पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे (१९७९), पांढऱ्यावर काळे (१९७१), रानमेवा (१९७८), चित्रे आणि चरित्रे (१९८३) ही त्यांची पुस्तके ललित गद्य ह्या प्रकारातली.
रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली; जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.
त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. त्यांत गावाकडील गोष्टी, काळी आई ह्यांसारखे कथासंग्रह,बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती ह्यांचा अंतर्भाव होतो. सत्तांतरला तर १९८३ चे साहित्य अकादेमीचे पारितोषिक प्राप्त झाले. १९८३ मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
प्रवास एक लेखकाचा हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४१ पुस्तकांचे पुण्यातील मेहता प्रकाशनकडून १८ मे २०१२ रोजी नव्याने प्रकाशन झाले.
सौजन्य : मराठी विश्वकोश