डोंबीवलीतील नामवंत तबलावादक पं. सदाशिव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:27 AM2017-09-07T09:27:42+5:302017-09-07T12:05:55+5:30

तबलावादक पं. सदाशिव पवार यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. 

The famous tabla player Pond in Dombivali Sadashiv Pawar died due to minor illness | डोंबीवलीतील नामवंत तबलावादक पं. सदाशिव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

डोंबीवलीतील नामवंत तबलावादक पं. सदाशिव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

googlenewsNext

डोंबीवली, दि. 7 - प्रख्यात तबलावादक पंडित सदाशिव पवार यांचे गुरुवारी पहाटे डोंबिवली पूर्व येथे राहत्या घरी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

नागरी सत्कार समिती ,डोंबिवली या ४० संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मंचातर्फे १७ मे  २०१५ रोजी त्यांना अभिवादन करण्याचा सोहळा आयोजित केला होता. प्राचार्य अशोक प्रधान यांचे शुभहस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.

अल्प परिचय
 पं. सदाशिव पवार मूळ गाव मापरवाडी, ता. वाई, जिल्हा सातारा, जन्म २८ जुलै १९३४, वयाच्या ११ व्या वर्षी तबला वादनाच्या ओढीनं मुंबईत आगमन, प्रारंभीचं तबला वादनाचं शिक्षण पं. चतुर्भुज राठोड यांच्याकडे, पुढलं शिक्षण फारूखाबाद घराण्याचे खलिफा उस्ताद आमीर हुसेन खॉँ यांच्याकडे.

पं. सदाशिव पवारांमधला कलाकार ख-या अर्थानं फुलला, उमलला तो उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर. तब्बल पन्नासहून अधिक वर्षं पवारांनी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ साहेबांना साथसंगत केली. बारा तासांचा रोजचा रियाझ, आणि आपल्या स्वतंत्र वादनशैलीमुळे ते लोकप्रिय तर झालेच, परंतु गेल्या साठ-पासष्ट वर्षातील तमाम गायकांना साथ दिली.

पं. सदाशिव पवारांनी १९८३ साली सदाशिव अॅकॅडेमी ऑफ म्युझिकची स्थापना डोंबिवलीत केली आणि जागतिक कीर्तीच्या गायक-वादकांचे कार्यक्रम डोंबिवलीकर रसिकांपुढे पेश केले. देशभरातील बहुतांश सुविख्यात शहरांमध्ये त्यांचे साथसंगतीचे आणि एकल वादनाचे कार्यक्रम झालेच, परंतु भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, अफगाणिस्थान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आदी अनेक देशांमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केले.

मुंबई आकाशवाणीच्या स्थापनेपासूनच पं. पवार आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करीत आले असून, माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी यांच्याबरोबर त्यांनी अफगाणिस्थानच्या दौºयात सांस्कृतिक शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून प्रवासही केला आहे.. मुंबई दूरदर्शनच्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं भाग्यही पं. पवारांना लाभलं होतं.

उत्तम वादक कलाकार हा उत्तम शिक्षक असत नाही आणि उत्तम शिक्षक हा उत्तम वादक असत नाही अशा अर्थाचं एक वचन आपल्याकडे सांगितलं जातं.पं. सदाशिव पवार मात्र याला अपवाद ठरले आहेत. ते उत्तम वादकही आणि शिक्षकही होते. चंद्रशेखर वझे, अरविंद पंडित, निषाद पवार, रूपक पवार, रमेश पाटणकर, सुरेंद्र नाईक, प्रवीण करकरे असे कितीतरी त्यांचे उत्तमोत्तम शिष्य.

सुप्रीसद्ध गायक सुरेश वाडकर आणि रूपक कुमार राठोड यासारख्या दिग्गज गायकांनी प्रारंभीच्या काळात तबला वादनाचे धडे पं. पवारांकडूनच गिरवले. पं. सदाशिव पवारांना डोंबिवली भूषण पुरस्कार, चतुरंग सन्मान, हलीन अॅकॅडेमी ऑफ सितारचा शरावती पुरस्कार, स्वरांकुर सन्मान, शारदा संगीत संस्थेचा सन्मान, आणि पं. राम मराठे  स्मृति पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी, जावई, सुना, नातवंड असा परिवार आहे.

Web Title: The famous tabla player Pond in Dombivali Sadashiv Pawar died due to minor illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.