'' या '' प्रसिद्ध युवा चित्रकाराने मोडला अमेरिकेच्या सर्वात मोठ्या चित्राचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 08:00 PM2019-05-06T20:00:26+5:302019-05-06T20:01:26+5:30
सर्वात मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी विजेता म्हणून भारताच्या नावाची घोषणा केली तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता..
पुणे : कधी 48.78 चौरस मीटर आकाराचे चित्र कुणी पाहिलयं का? पण इतकं मोठं चित्र रेखाटलंय एका पुण्याच्या युवा चित्रकाराने. जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान मिळवत त्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्या चित्रकाराचे नाव आहे संदीप सिन्हा...
अमेरिकेतील २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्राचा याआधीचा सर्वाधिक मोठया चित्राचा विक्रम संदीपने मोडून काढला आहे. संदीप माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक असून, तो टेकमहिंद्र कंपनीत काम करतो. २०१५ मध्ये आपल्या लघुचित्रांद्वारे (मिनिएचर पेंटिंग्ज) आणखी एक विक्रम त्याने प्रस्थापित केला आहे. त्याअंतर्गत त्यांनी ’जीवन आणि वैश्विक तापमानवाढ’ (लाईफ अँड ग्लोबल वॉर्मिंग) या संकल्पनेवर आधारित एक सेंटिमीटर लांबी-रुंदीच्या आकाराची ९४५ लघुचित्रे १४ इंच गुणिले ११ इंच आकाराच्या कॅनव्हासवर साकारली होती. या कलाकृतीला कलारसिकांकडून खूपच वाखाणले गेले आणि जागतिक मान्यताही मिळाली. या जागतिक विक्रमाविषयी त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वात मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी विजेता म्हणून भारताच्या नावाची घोषणा केली तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. यापूर्वी अमेरिकेच्या नावावर २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्रासाठी जवळपास चार वर्षे जमा होता. तो मोडून काढल्याचा आनंद असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
या चित्राचे शीर्षक ‘हिमाखन’ आहे. त्याचा अर्थ हिमालयासारखा खंबीर मनाचा आणि लोण्यासारखा (माखन) मृदू अंत:करणाचा असा आहे. माखन हे माझ्या वडिलांचेही नाव असल्याने मी चित्राला ते शीर्षक दिले. हे तैलचित्र पूर्ण करायला मला अडीच महिने लागले. जागतिक विक्रमाच्या नियमांनुसार असे चित्र एकच देखावा रेखाटलेले (सिंगल सीन) असावे लागते. त्यामुळे मी निसर्गाची प्रतिकात्मकता आणि भव्यता रसिकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने माझ्या कलाप्रकारासाठी हिमालय पर्वतरांगा ही संकल्पना निवडली, असे संदीप याने स्पष्ट केले
संदीप यांनी आपले हे चित्र अँसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना समर्पित केले आहे. हिमालय हा सर्व आव्हानांना तोंड देऊन खंबीर उभा असतो, तशाच हल्ल्यातून वाचलेल्या महिलाही निर्धाराने जीवनात उभ्या आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले.
........
माझे यश हे कुटुंब, मित्र आणि हितचिंतकांचेही आहे, ज्यांच्या पाठिंब्या शिवाय हे हिमालयाएवढे उत्तुंग आव्हान पेलणे शक्यच झाले नसते’’- संदीप सिन्हा, युवा चित्रकार