मोक्याच्या जागा खासगी संस्थांना आंदण
By admin | Published: June 29, 2016 01:54 AM2016-06-29T01:54:24+5:302016-06-29T01:54:24+5:30
महापालिकेबरोबरचा भाडेकरार संपल्यानंतरही तब्बल २४२ भाडेकरूंनी नूतनीकरणासाठी अनेक वर्षे अर्ज केलेला नाही़
मुंबई : महापालिकेबरोबरचा भाडेकरार संपल्यानंतरही तब्बल २४२ भाडेकरूंनी नूतनीकरणासाठी अनेक वर्षे अर्ज केलेला नाही़ पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा संस्था, कंपन्या व व्यक्ती मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा लाभ उठवित आहेत़ यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सचाही समावेश आहे़
पालिकेच्या चार हजार मालमत्ता भाडेकराराने खासगी संस्था, कंपन्या आणि व्यक्तींना देण्यात आल्या आहेत़ यापैकी २४२ मालमत्तांचा भाडेकरार संपून अनेक वर्षे लोटली आहेत़, परंतु या कंपन्यांनी अथवा संस्थांनी भाडेकराराच्या नूतनीकरणासाठी पालिकेशी संपर्क साधलेला नाही़ महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा ताबा असलेल्या मे़ रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबबरोबरचा करारही २०१३ मध्ये संपुष्टात आला आहे़
रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन पालिकेने त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती़ मात्र, हा प्रस्ताव शासन दरबारी रेंगाळला आहे़ हा निर्णय होईपर्यंत पालिका प्रशासनाने अन्य २४१ मालमत्तांबाबतही निर्णय लांबणीवर टाकला आहे़ यापैकी काही संस्थांनी इमारतींमध्ये बेकायदा बांधकाम केले असल्यानेच त्या या नूतनीकरणासाठी पुढे येत नसल्याचे बोलले जाते़ (प्रतिनिधी)
> चार हजार मालमत्ता भाडेकराराने
पालिकेच्या चार हजार मालमत्ता भाडेकराराने खासगी संस्था अथवा कंपन्यांना दिल्या आहेत़
२४२ संस्था व कंपन्यांबरोबर केलेला करार संपुष्टात आला आहे़ मात्र, अद्याप त्याचे नूतनीकरण झालेले नाही़
यामध्ये माध्यम समूहांची कार्यालये, हॉटेल्स, खासगी, तसेच सरकारी बँकांची कार्यालये व खासगी कार्यालयांचाही समावेश आहे़
नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच या संस्था नूतनीकरणासाठी पुढे येत नसल्याने, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी नगरसेवकांकडून सुरू आहे़ निश्चित धोरण तयार करावे, असे निर्देश सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी दिले आहेत़