१७४ एसटी कर्मचारी बडतर्फ, कामावर येणाऱ्यांची संख्या कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:44 AM2021-12-28T07:44:28+5:302021-12-28T07:44:55+5:30
ST employees : निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, आतापर्यंत रोजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करूनही ते न परतल्याने सोमवारी १७४ निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४१५ वर पोहोचली आहे.
एसटीमधील कनिष्ठ श्रेणी कामगार संघटनेने २० डिसेंबरला संप मागे घेतला. त्यानंतर महामंडळानेही कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घेत २३ डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर येण्याचे आवाहन केले. परंतु, बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने २४ डिसेंबरपासून पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ४१५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, १० हजार ७३१ जणांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, आतापर्यंत रोजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामावर येणाऱ्यांची संख्या कमीच
कारवाईच्या इशाऱ्यानंतरही कामावर येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन वेळा संधी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही ते कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत ६०० हून अधिक निलंबित कामगारांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे.