अनियमित पावसामुळे खरिपाला फटका; सर्वाधिक नुकसान मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 06:28 AM2018-09-02T06:28:10+5:302018-09-02T06:28:27+5:30
धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी पठारी भागात अनियमित व कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने, खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे : धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी पठारी भागात अनियमित व कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने, खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक फटका, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. १४ जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे.
राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २४ आॅगस्ट या काळातील खरिपाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, ऊस वगळून १३४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के) खरीप पिकांची पेरणी झाली. नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सातारा, सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने किडीचा प्रादुर्भाव झाला. अनियमित व कमी पावसामुळे उडीद, मूग व कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
नांदेड, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी व पुरामुळे कापूस, सोयाबीन, भात, मूग, तूर, ज्वारी बाजरीचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २४ हजार ५८४ हेक्टर, चंद्रपूरमध्ये ११ हजार १६१ हेक्टर, नांदेडमध्ये ७१ हजार ३४९, जळगावमध्ये २५४ हेक्टर, गडचिरोलीमध्ये ९ हजार ६४२ हेक्टर, नंदुरबारमध्ये ६१५ तर धुळे जिल्ह्यात ८५८ हेक्टर अशा एकूण १ लाख १८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भात पिकावर खोडकिडा, तुडतुडे, निळे भुंगेरे, गादमाशी, पिवळ्या खोडकिडी व लष्करी अळीचा तर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
ज्वारीच्या पेरणीत २३ टक्के, बाजरी- २१ टक्के, नाचणी व मका प्रत्येकी ११ टक्के, उडीद २४ टक्के आणि मुगाच्या क्षेत्रात १२ टक्यांनी घट झाली. सूर्यफुलाच्या क्षेत्रात ५२ टक्के, कारळे ३० टक्के घट आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नेमके किती क्षेत्र बाधित झाले आहे, हे पंचनामे केल्यानंतरच स्पष्ट होईल. उत्पादन नेमके किती घटले, हे काढणीनंतर स्पष्ट होईल, असे कृषी विस्तार संचालक विजय घावटे यांनी सांगितले.
२० हजार गावांत कापसाची पेरणीच नाही
राज्यात कापूस पिकाखाली २६ जिल्हे असून एकूण २० हजार १६० गावामध्ये पेरणीच झालेली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कापसाचे उत्पादनच धोक्यात असल्याचे दिसून आले.
तालुकावार पावसाची स्थिती
विभाग ५०-७५% ७५-१००% १००% +
कोकण ३ (तालुके) १० ३४
नाशिक १५ १२ १२
पुणे १६ ११ १२
कोल्हापूर ८ १२ १३
औरंगाबाद ११ १४ ३
लातूर ७ २२ १९
अमरावती ८ २५ २३
नागपूर १० ३५ १९