कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, मंत्रालयाच्या गेटवर फेकला डाळ-कांदा
By Admin | Published: May 2, 2017 04:34 PM2017-05-02T16:34:26+5:302017-05-02T17:00:04+5:30
संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी बळीराजा संघटनेचे कार्यकत्यांनी मंत्रालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी बळीराजा संघटनेचे कार्यकत्यांनी मंत्रालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतक-यांनी तूर डाळ, कांदे आणि केळी रस्त्यावर फेकून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
एकीकडे शेतकऱ्यांकडील तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत, खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढला आहे. या सर्वात भर म्हणून गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे पिचलेल्या शेतक-यांनी मंत्रालयाच्या आवारात डाळ, कांदा फेकून आपला राग व्यक्त केला. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्या शेतक-यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलींची लग्नं आणि उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी संकटात सापडले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत तूरडाळ भेट पाठवून संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सोमवारी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, ज्येष्ठ शेतकरी नेते पां.जा. विशे, एकनाथ वेखंडे आदी मान्यवर मंडळी होती.
तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने संकटात सापडले असून शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च मिळणेदेखील दुरापास्त झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी गरजेची आहे. आधीच पिचलेले शेतकरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे आणखी अडचणीत येणार आहे.
या महामार्गात शेतकऱ्यांची हजारो हेक्टर बागायती जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग रद्द आणि शेतीमालाला योग्यभाव याबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंती आमदार बरोरा यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.