खरीप हंगामावर शेतक-यांचा बहिष्कार!

By admin | Published: March 8, 2016 02:23 AM2016-03-08T02:23:35+5:302016-03-08T02:23:35+5:30

आर्थिक परिस्थितीमुळे वाशिम जिल्ह्यातील जामदरी गावातील शेतक-यांनी घेतली टोकाची भूमिका, मोलमजुरी करून उपजिविका भागविणार.

Farmer boycott at Kharif season! | खरीप हंगामावर शेतक-यांचा बहिष्कार!

खरीप हंगामावर शेतक-यांचा बहिष्कार!

Next

विवेक चांदूरकर/ वाशिम
गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेला दुष्काळ, थकीत कर्जामुळे बँकांचे बंद झालेले दरवाजे आणि पेरणीसाठीही पैसे नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी खरिप हंगामावर बहिष्कार टाकण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. वाशिम जिल्ह्यातील जामदरा गावात हा प्रकार समोर आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील जामदरा गाव गत तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळले जात आहे. दरवर्षी शेतात लाखो रूपये लाऊन निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. परिणामी, शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्पादन खर्चाच्या ५0 टक्केही उत्पन्न होत नाही. शेतकर्‍यांनी पदरचे पैसे शेतीत लावले, त्यानंतर बँकांकडून कर्ज घेतले, मात्र अल्प उत्पन्नामुळे कर्ज थकले. अशातच सावकारांनीही दरवाजे बंद केल्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसेच राहिले नाहीत. त्यामुळे आणखी कर्ज काढून, पुन्हा नुकसानाचा सामना करण्यापेक्षा यावर्षी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यासाठी गावकर्‍यांच्यावतीने गावात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते. यावर्षीच्या हंगामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावर्षी पेरणीच करायची नाही, त्याऐवजी मोलमजूरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा, असे यावेळी गावकर्‍यांनी सर्वानुमते ठरविले. पीक घेण्यासाठी पैसे आणि श्रमही लागतात. त्याऐवजी मोलमजुरी केली, तर हमखास पैसे मिळतात. मजुरीचे दर वाढले असल्यामुळे त्या माध्यमातून कुटुंबाचे पालनपोषण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा पर्याय गावकर्‍यांनी निवडला. याबाबतचे निवेदन त्यांनी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना दिले आहे.

ना मागणी, ना तक्रार, ना रोष
गावकर्‍यांनी खरीप हंगामावर बहिष्कार टाकताना शासनाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. कुणाप्रती रोष व्यक्त केला नाही, किंवा कुणाची तक्रारही केली नाही. जमीन पडिक ठेऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बँकांचे दरवाजे बंद
घरातील भागभांडवल संपल्यामुळे शेतकर्‍यांनी बँकांकडून कर्ज घेतले. बँकांचे कर्ज थकल्यानंतर गतवर्षी पुनर्गठन करून नवीन कर्ज घेण्यात आले; मात्र शेतीचे उत्पन्न २५ टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे ते कर्ज भरण्यासाठीही शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. कर्जाचा डोंगर मात्र कायम आहे. शासनाच्या कडक धोरणामुळे सावकरांनी कर्ज देणे बंद केले आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे सोनेही नाही. एकूणच सर्व बाजुंनी आर्थिक कोंडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Web Title: Farmer boycott at Kharif season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.