शेतकरी संप : सातारा हायवेवर जाळपोळ !

By admin | Published: June 5, 2017 02:07 PM2017-06-05T14:07:38+5:302017-06-05T14:07:38+5:30

शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला "पुणे-बंगळुरू हायवे"वरील उडतारे गावाजवळ हिंसक वळण लागले.

Farmer collapses: Burnout on Satara highway | शेतकरी संप : सातारा हायवेवर जाळपोळ !

शेतकरी संप : सातारा हायवेवर जाळपोळ !

Next
>ऑनलाइन लोकमत 
सातारा/ पाचवड, दि. 5 -शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला "पुणे-बंगळुरू हायवे"वरील उडतारे गावाजवळ हिंसक वळण लागले. टायरसहीत इतर वस्तू जाळून वाहने रोखण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात  मोर्चाही काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीही देण्यात आल्या. शेतक-यांच्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.   
 
दरम्यान,आपल्या न्याय मागण्यांसाठी पहिल्यांदाच संपाचे शस्त्र उगारणा-या पोशिंद्याच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचा संकल्प सातारा शहरातील बहुतांश नागरिकरांनी केला. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर व्यावसायिकांनी या बंदला संमिश्र पाठिंबा दिला. 
मात्र, ज्या व्यापा-यांनी दुकाने सुरू ठेवली होती, त्यांना गांधीगिरी करत दुधाचे वाटप करून संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन शेतक-यांनी केले. सोमवारी बाजारपेठ भलतीच सुस्तावली होती. कपड्यांची दुकाने बंद होती.  काही मिठाई आणि बेकरी दुकानांचे अर्धे शटर उघडले होते. त्यातून अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना सातारकर दिसत होते. 
 
गांधी मैदानापासून शेतकरी संघटनेने मोर्चा काढून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना संपास पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच शेतकरी संघटनेने मोर्चामध्ये आणलेल्या दुधाच्या किटल्यांतून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना दूध देवून संपास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 
 
हा मोर्चा गांधी मैदानपासून ते पोवईनाकापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटना आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा पुढे गेल्यानंतर शहरातील बहुतांश व्यापा-यांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहारास सुरूवात केल्याचे चित्र सातारा शहरात दिसले तरी ग्राहकांची वर्दळ मात्र बाजारपेठेत कमी होती. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

Web Title: Farmer collapses: Burnout on Satara highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.